सामान्य प्रवाशांना खटारा, प्रताप सरनाईक प्रवास करणार म्हणताच एसटीची चमकोगिरी; दिली चकाचक लालपरी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 08:51 IST2025-02-20T08:50:55+5:302025-02-20T08:51:13+5:30
कुठे सीट तुटलेल्या, कुठे सीटवरील कुशन फाटलेले, खिडक्या तुटलेल्या एक ना अनेक समस्या दररोज एसटी प्रवाशांना सहन कराव्या लागत आहेत. अशातच मंत्री प्रवास करणार हे समजताच एसटी विभागाने अगदी शोरुममधून काढलेल्यासारखी ब्रँड न्यू लालपरी त्या मार्गावर सोडली होती.

सामान्य प्रवाशांना खटारा, प्रताप सरनाईक प्रवास करणार म्हणताच एसटीची चमकोगिरी; दिली चकाचक लालपरी...
एखादा मंत्री, संत्री येणार असेल तर त्या मार्गावरील रस्ते कसे रातोरात चकाकच केले जातात, रातोरात रंगविले जातात. तसेच रातोरात खड्डेही बुजविले जातात, तसाच प्रकार गोरगरीबांसाठी असलेल्या एसटी महामंडळाने केला आहे. कुठे सीट तुटलेल्या, कुठे सीटवरील कुशन फाटलेले, खिडक्या तुटलेल्या एक ना अनेक समस्या दररोज एसटी प्रवाशांना सहन कराव्या लागत आहेत. अशातच मंत्री प्रवास करणार हे समजताच एसटी विभागाने अगदी शोरुममधून काढलेल्यासारखी ब्रँड न्यू लालपरी त्या मार्गावर सोडली होती.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर ते धाराशिव एसटी बसने प्रवास केला. यासाठी एसटी मंडळाने चकाचक एसटी त्यांच्या प्रवासासाठी दिली होती. बुधवारी सायंकाळी सरनाईक त्यांच्या कार्यकर्त्यांसह एसटी बसने सोलापूरहून धाराशीवला निघाले. एसटी प्रवासात येणाऱ्या अडचणी त्यांना समजून घ्यायच्या होत्या. परंतू, एसटी विभागाने एसटीच नवीकोरी दिल्याने कसल्या समस्या आणि कसले काय, अशा प्रतिक्रिया प्रवाशांमधून येत होत्या.
एसटी मंडळाने आपल्यासाठी नवीन कोरी चकचकीत बस दिल्याचेही सरनाईक यांनी मान्य केले. प्रसारमाध्यमांनी सरनाईक यांना अनेक प्रश्न विचारले. यावेळी एसटी बसेसची अवस्था वाईट आहे, हे देखील कबुल केले.
सर्वसामान्य लोकांच्या काय भावना आहेत, त्यांना कुठल्या समस्याना तोंड द्यावं लागतं याची माहिती मी आगार पाहणी दौऱ्यातून घेतो. निश्चितच अनेक एसटी बसेसची अवस्था वाईट आहे, अनेक एसटी सक्रॅप करायच्या आहेत. पण आम्ही पाच हजार नवीन एसटीची मागणी केलीय, सोलापूर धाराशिवसाठी देखील निश्चितच काही बसेस देण्यात येतील. अचानक दौरा देखील मी काही ठिकाणी केला आहे. परंतू हा दौरा आधीच नियोजित होता, त्यामुळे स्वछता जास्त दिसते आणि बस ही चांगली देण्यात आली ही वस्तूस्थिती आहे. पण सर्वसामान्य लोकांना ही चांगल्या एसटीतून प्रवास करता यावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे सरनाईक यांनी प्रसारमाध्यमांसमोर कबुल केले.