गौरव आहुजाच्या मित्राचा मेडिकल रिपोर्ट आला; भाग्येश ओसवाल अल्कोहोल पॉझिटीव्ह, आहुजाचे काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 12:46 IST2025-03-09T12:45:40+5:302025-03-09T12:46:27+5:30
Gaurav Ahuja Pune News: आहुजाच्या शरिरात अल्कोहोल सापडू नये म्हणून तो पार अगदी कोल्हापूरच्या पलिकडे पळून गेला होता. रात्री उशिराने त्याने पोलिसांत शरण जाण्याचे जाहीर केले.

गौरव आहुजाच्या मित्राचा मेडिकल रिपोर्ट आला; भाग्येश ओसवाल अल्कोहोल पॉझिटीव्ह, आहुजाचे काय?
बिल्डर बाळानंतर पुण्यात आता गौरव आहुजा नावाच्या श्रीमंतीचा माज असलेल्या तरुणाची चर्चा सुरु झाली आहे. सकाळी सकाळी दारू पिऊन भर रस्त्यात सिग्नलवर गाडी थांबवत रस्त्याकडेला लघुशंका केली. लोकांनी जाब विचारला तर त्यांना महिलांसमोर अश्लिल कृत्य करून जोरात कार चालवत पसार झाले. या कारमध्ये या आहुजाचा मित्रही होता व त्याच्या हातात दारुची बाटली स्पष्ट दिसत होती. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते, परंतू आहुजा पसार झाला होता. या मित्राचा वैद्यकीय अहवाल आला आहे.
गाडीत दारुची बाटली घेऊन दिसत असलेल्या भाग्येश ओसवाल याच्या वैद्यकीय अहवालात तो अल्कोहोलच्या अमलात असल्याचे समोर आले आहे. आहुजाच्या देखील नमुन्यांमध्ये अल्कोहोलचे प्रमाण सापडल्याचे समजते आहे. त्याची कराड पोलिसांनी कराडमध्ये वैद्यकीय चाचणी केल्याचे सांगितले जात आहे.
आहुजाच्या शरिरात अल्कोहोल सापडू नये म्हणून तो पार अगदी कोल्हापूरच्या पलिकडे पळून गेला होता. रात्री उशिराने त्याने पोलिसांत शरण जाण्याचे जाहीर केले. आपली बीएमडब्ल्यू कार त्याने कोल्हापूरच्या अलीकडे २० किमीवर लावली आणि भाड्याने कार करून तो पुढे धारवाडला निघाला होता. मध्येच असे काय झाले की त्याने गाडी माघारी वळविली आणि चालकाला व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सांगितले. तो व्हिडीओ त्याने आपल्या मित्रांना पाठवून व्हायरल करायला सांगितला. यात त्याने माफी मागितली होती. यात तो शिंदे साहेबांचीही माफी मागत आहे. आता हे शिंदे साहेब कोण, असा प्रश्न लोकांना पडला आहे.
अशातच ओसवाल हा पुणे पोलिसांच्या ताब्यात होता. त्याच्या मित्रांनी त्याला खायला देण्यासाठी बर्गर आणि कोल्ड क़ॉफी, कोल्डिंक आणले होते. तिथे मीडियाचे कॅमेरे होते. यावेळी पोलिसांनी ओसवालच्या मित्रांना तिथून हाकलून लावले होते. बिल्डर बाळ प्रकरणात पोलिस ठाण्यात त्या बाळाला बर्गर खायला घातला होता. या प्रकरणामुळे पोलिसांनी ही रिस्क घेतली नाही. आता गौरव आहुजाच्या मेडिकल रिपोर्टची प्रतिक्षा पोलिसांना आहे.