गौराई माझी लाडाची लाडाची गं, मुस्लीम कुटुंबात ४० वर्षांपासून सुखाने नांदते गौराई
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 12:23 IST2025-09-02T12:21:07+5:302025-09-02T12:23:42+5:30
सातेफळ (ता. जामखेड) येथील सय्यद कुटुंब गेल्या दोन पिढ्यांपासून गौराईची स्थापना करते.

गौराई माझी लाडाची लाडाची गं, मुस्लीम कुटुंबात ४० वर्षांपासून सुखाने नांदते गौराई
संतोष थोरात
लोकमत न्यूज नेटवर्क
खर्डा (जि. अहिल्यानगर) : सातेफळ (ता. जामखेड) येथील सय्यद कुटुंब गेल्या दोन पिढ्यांपासून गौराईची स्थापना करते. मुस्लीम कुटुंब असूनही हिंदूंचा हा सण ते मागील ४० वर्षांपासून मोठ्या उत्साहात अन् मोठ्या श्रद्धेने साजरा करतात. धार्मिक सलोखा आणि सामाजिक एकतेचे हे कुटुंब एक आदर्श उदाहरण ठरले आहे. १९७२ च्या दुष्काळात रशीद दगडू सय्यद यांचे वडील दगडू नन्हू सय्यद हे उदरनिर्वाहासाठी मूळ गाव मलकापूर (ता. परंडा) सोडून सातेफळ येथे आले.
गावातील महिला दर्शनासाठी घरी : तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात ते गौरी-गणपतीसमोर सुंदर रांगोळी काढतात. मूर्तींची पूजा करतात. आकर्षक सजावट करतात. त्यासाठी विद्युत रोषणाई, विविध फराळ आणि खेळण्यांची सुंदर मांडणी केली जाते.
शेतात सापडल्या मूर्ती
शेतात काम करताना त्यांना लक्ष्मीच्या दोन मूर्ती सापडल्या. सलग चार दिवस या मूर्ती शेतातच होत्या. नंतर त्यांनी या मूर्ती घरी आणल्या खऱ्या, पण त्यांचे पुढे काय करायचे, हा प्रश्न कुटुंबाला पडला. त्यावर उपाय म्हणून त्यांनी गावातील मंदिराचे पुजारी, मौलाना आणि ज्येष्ठ नागरिकांचा सल्ला घेतला व गौरीपूजन करून मूर्ती स्थापना केली. तेव्हापासून सय्यद कुटुंबाने ही परंपरा सुरू केली. सय्यद कुटुंबाची ही गौराई पाहण्यासाठी, तसेच सातेफळसह परिसरातील महिला हळदी-कुंकवासाठी आवर्जून घरी येतात.