भारताच्या उभारणीत नितीन गडकरींची कामगिरी मोलाची; रतन टाटांची शाबासकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 13:19 IST2018-12-07T13:12:02+5:302018-12-07T13:19:55+5:30
गडकरी यांच्या चार वर्षांच्या कामगिरीवरील 'इंडिया इन्स्पायर' या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात टाटा बोलत होते.

भारताच्या उभारणीत नितीन गडकरींची कामगिरी मोलाची; रतन टाटांची शाबासकी
मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना आपण चाळीस वर्षांपासून ओळखतो. पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या माध्यमातून त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. गडकरी यांच्याकडे धाडसी नेतृत्व असल्याचे गौरवोद्गार उद्योगपती रतन टाटा यांनी काढले.
गडकरी यांच्या चार वर्षांच्या कामगिरीवरील 'इंडिया इन्स्पायर' या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात टाटा बोलत होते. प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही कारणांमुळे कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. गंगा नदी स्वच्छ करण्याचे काम २०२० मार्चपर्यंत पूर्ण होईल, असे नितीन गडकरी यांनी जाहीर केले. त्याचबरोबर नवी मुंबईतील विमानतळ सुरू होण्यापूर्वी मुंबईच्या चारही दिशांनी जलवाहतुकीचा वापर करून वॉटर टॅक्सीने त्या विमानतळाला जोडणारा प्रकल्प पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.
नद्या जोड प्रकल्प पूर्ण झाल्यावर पाणी प्रश्न, पुरासारख्या समस्या दूर होतील, असा विश्वास राजीव कुमार यांनी व्यक्त केला. तर नेपोलियनप्रमाणे नितीन गडकरी यांच्या शब्दकोशात अशक्य हा शब्द नाही, असे उद्गार राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.
देश पहिल्या क्रमांकावर जाण्यासाठी मंत्र्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्याची गरज गडकरी यांनी व्यक्त केली. हा आत्मविश्वास त्यांना 'इंडिया इन्स्पायर' मिळेल. इच्छा असेल तरच मार्ग सापडतो अन्यथा फायली अहवाल यातच सरकारचे कामकाज रखडून पडते, असा टोलाही त्यांनी लगावला.