'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 

By संजय तिपाले | Updated: April 4, 2026 12:47 IST2026-04-04T12:46:43+5:302026-04-04T12:47:39+5:30

Gadchiroli Crime News: प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका तरुणास हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढले, त्यानंतर ब्लॅकमेल करुन पैसे उकळले. चार लाख दिल्यावरही भूक थांबली नाही, १५ लाखांसाठी त्याला  थेट विष पाजून संपविण्याचा प्रयत्न केला.

Gadchiroli Crime News: 'You die, or I will kill you!' Honey trap, blackmailing and poisoning of a young man in Armori, case registered against two including a young woman | 'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 

'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 

गडचिरोली - प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका तरुणास हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढले, त्यानंतर ब्लॅकमेल करुन पैसे उकळले. चार लाख दिल्यावरही भूक थांबली नाही, १५ लाखांसाठी त्याला  थेट विष पाजून संपविण्याचा प्रयत्न केला. एखाद्या चित्रपटाला शोभेल, अशी ही थरारक घटना आरमोरी येथे ३ एप्रिल रोजी उघडकीस आली.  याप्रकरणी तरुणीसह तिच्या दोन साथीदारांवर आरमोरी ठाण्यात खंडणी व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला.  

 पोलिसांच्या माहितीनुसार, आरमोरी येथील एका २६ वर्षीय तरुणाचे एका २३ वर्षीय तरुणीसोबत सूत जुळले होते. मात्र, तिच्या आयुष्यात नव्या प्रियकराची एंट्री झाल्याने  त्यांच्यात खटके उडू लागले. याच संधीची वाट पाहत असलेल्या दोन तरुणांनी मध्यस्थीचा आव आणला.  तुझे चॅटिंग आमच्याकडे आहे, ते व्हायरल करून तुझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करू,  अशी धमकी देत या त्रिकुटाने संबंधित तरुणाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. बदनामीच्या भीतीने तरुणाने वेळोवेळी त्यांना सुमारे ३ ते ४ लाख रुपये दिले.
....
​१५ लाखांची मागणी, मारहाण करुन पाजले विष
​आरोपींची पैशांची भूक एवढ्यावरही शमली नाही. त्यांनी पीडित तरुणाकडे थेट १५ लाख रुपयांची मागणी केली. पैशांची तरतूद न केल्यास तू मरुन जा, नाही तर आम्ही तुला मारु, अशी टोकाची धमकीही दिली.१३ मार्च २०२६ रोजी संबंधित तरुण ब्रह्मपुरी रोडने जात असताना आरोपींनी त्याला वाटेतच गाठले. तिथे त्याला बेदम मारहाण करण्यात आली आणि चक्क बळजबरीने त्याच्या तोंडात शेतीचे कीटकनाशक ओतले. तरुण निपचित पडल्यावर आरोपींनी तिथून पळ काढला.
....

​नागपुरात मृत्यूशी झुंज अन् धक्कादायक खुलासा
​विषप्राशन केल्याने पीडित तरुणाची प्रकृती चिंताजनक झाली होती. त्याला तातडीने नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक दिवस शुद्ध हरपलेला हा तरुण शुद्धीवर येताच ३ एप्रिलला त्याने आपबिती सांगितली, त्यामुळे पोलिसही चक्रावून गेले. विशेष म्हणजे तरुणास विष पाजल्यानंतर त्याच्या मोबाइलवरुन वडिलांना बाबा, मला माफ करा, असा मेसेज धाडला व विषाच्या बाटलीचा फोटो श्रेया हेमके हिच्या मोबाइलवर पाठविला होता, यावरुन प्रेमप्रकरणातून त्याने स्वत: विष घेतल्याचे भासविण्याचा आरोपींचा प्रयत्न होता. 
....
​यांच्यावर झाला गुन्हा दाखल
​तक्रारीनुसार आरमोरी पोलिसांनी श्रेया हेमके, नितीन जोध, राजू अंबानी  (सर्व रा. आरमोरी) यांच्याविरुद्ध   गुन्हा नोंदवला आहे. या टोळीने आणखी कोणा तरुणांना अशाप्रकारे जाळ्यात ओढले आहे का? याचा तपास आता पोलिस करत आहेत. आरोपींचा शोध सुरु असल्याचे पो.नि. कैलास गवते यांनी सांगितले.
....

Web Title : हनी ट्रैप, ब्लैकमेल, जहर: अर्मोरी में महिला और साथी गिरफ्तार।

Web Summary : अर्मोरी में एक युवक को हनीट्रैप में फंसाया गया, पैसे के लिए ब्लैकमेल किया गया और ₹1.5 मिलियन न देने पर जहर दे दिया गया। एक महिला और दो अन्य पर मामला दर्ज।

Web Title : Honey trap, blackmail, poisoning: Woman and accomplices booked in Armori.

Web Summary : In Armori, a youth was honey-trapped, blackmailed for money, and poisoned after he failed to pay ₹1.5 million. A woman and two others are booked.