'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 23:36 IST2025-09-25T23:08:53+5:302025-09-25T23:36:25+5:30
संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफ द्वारे पूर्ण मदत करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना केली.

'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
CM Devendra Fadnavis Letter: गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात हाहाकार उडाला आहे. मराठवाड्यात पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून सर्वाधिक फटका बळीराजाला बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकराकडून मदतीची अपेक्षा केली आहे. सरकारने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी २२१५ कोटी मंजूर केले असून सगळे निकष बाजूला ठेवून मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. दुसरीकडे, शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र दिलं आहे.
मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक भागात पिकांसह जमीनच वाहून गेल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. अशातच महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांसाठी एनडीआरएफ अंतर्गत अतिरिक्त आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र दिलं. एनडीआरएफ निधीमधून जास्तीत जास्त मदत आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
पत्रात काय म्हटलं?
"महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीबद्दल आम्ही तुम्हाला गंभीर चिंता व्यक्त करत लिहित आहोत. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीच्या जमिनीचे अभूतपूर्व नुकसान झाले आहे आणि राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. महाराष्ट्रातील ३१ हून अधिक जिल्हे सततच्या मुसळधार पावसामुळे आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात शेतीच्या जमिनीवर पिकांचे नुकसान झाले आहे, जे आमच्या शेतकरी समुदायासाठी खूप चिंतेची बाब आहे. ही परिस्थिती विशेषतः आमच्या शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक आहे जे आधीच मागील शेतीच्या अडचणींमधून सावरण्याचा प्रयत्न करत होते. पीक नुकसानीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यासाठी आम्ही राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून २,२१५ कोटी रुपयांची रक्कम वाटप केली आहे. खरीपाच्या अखेरीस (सप्टेंबर २०२५) पर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे. यामुळे आतापर्यंत ५० लाख हेक्टरपेक्षा जास्त शेती क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्र सरकारला राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीकडून जास्तीत जास्त मदत वाटप करण्याची आवश्यकता आहे जेणेकरून बाधित शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळेल आणि त्यांचे जीवनमान पुन्हा उभारण्यास मदत होईल," असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.