प्रमोद महाजन ते अजित पवार; अकाली निधनाची आरपार वेदना
By नंदकिशोर पाटील | Updated: January 29, 2026 10:37 IST2026-01-29T10:35:22+5:302026-01-29T10:37:37+5:30
Ajit Pawar Death News: काळाच्या वादळातही ज्यांची ज्योत लोकांच्या आशेने तेवत राहिली, असे नेते काळाच्या पडद्याआड गेले. प्रमोद महाजन, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, आर.आर. पाटील, राजीव सातव आणि आता अजित पवार. प्रत्येक नावासोबत एक काळ संपला, एक दिशा हरवली, आणि महाराष्ट्राच्या मनावर एक न भरून येणारी रेघ उमटली.

प्रमोद महाजन ते अजित पवार; अकाली निधनाची आरपार वेदना
- नंदकिशोर पाटील
छत्रपती संभाजीनगर - काळाच्या वादळातही ज्यांची ज्योत लोकांच्या आशेने तेवत राहिली, असे नेते काळाच्या पडद्याआड गेले. प्रमोद महाजन, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, आर.आर. पाटील, राजीव सातव आणि आता अजित पवार. प्रत्येक नावासोबत एक काळ संपला, एक दिशा हरवली, आणि महाराष्ट्राच्या मनावर एक न भरून येणारी रेघ उमटली. अजितदादांच्या अकाली जाण्याने उद्याच्या महाराष्ट्राचा आश्वासक आधारही गेला. या सर्वांच्या अकाली निधनाने महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या मनात एकच प्रश्न उभा आहे, ‘एवढ्या लवकर का?’
प्रमोद महाजन
प्रमोद महाजन हे आधुनिक महाराष्ट्राच्या राजकारणातील रणनीतीकार होते. संघटन, संवाद आणि राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचा आवाज बुलंद करण्याची त्यांची क्षमता दुर्मीळ होती. ते गेले आणि राज्याच्या राजकारणात विचारपूर्वक योजना आखणारा, विरोधकांशीही संवाद ठेवणारा नेता कमी झाला.
विलासराव देशमुख
विलासराव देशमुख यांनी सुसंस्कृत, सौम्य पण ठाम नेतृत्वाचा आदर्श उभा केला. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी विकास आणि सामाजिक समतोल यांचा ताळमेळ साधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यानंतर राजकारण अधिक आक्रमक, अधिक ध्रुवीकरणाकडे झुकले, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.
गोपीनाथ मुंडे
गोपीनाथ मुंडे हे ग्रामीण महाराष्ट्राचा बुलंद आवाज होते. शेतकरी, वंचित, ओबीसी समाज यांच्या प्रश्नांना त्यांनी राजकीय केंद्रस्थानी आणले. संघर्षातून उभे राहिलेले नेतृत्व म्हणजे काय, हे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या जाण्याने ग्रामीण प्रश्नांना धार देणारा, जमिनीवरचा नेता कमी झाला.
आर.आर. पाटील
आर.आर. पाटील उर्फ आबा हे स्वच्छ प्रतिमा, साधेपणा, आणि निर्भीड निर्णयांचे प्रतीक होते. गृहखात्यासारख्या अत्यंत जबाबदारीच्या आणि दबाव असलेल्या खात्यातही त्यांनी मानवी दृष्टिकोन जपला. राजकारणात नैतिकतेचा, पारदर्शकतेचा आग्रह धरणारा नेता गमावणे हे समाजासाठी मोठे नुकसान ठरले.
राजीव सातव
राजीव सातव हे नव्या पिढीचे, समन्वय साधणारे आणि संघटन मजबूत करणारे नेतृत्व होते. काँग्रेससारख्या पक्षात तरुणांना संधी, संवाद आणि आधुनिक राजकीय भाषा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांच्या अकाली जाण्याने राज्यात उदयोन्मुख, भविष्याचा विचार करणारे नेतृत्व खुंटले.
सत्ता, प्रशासन अन् लोकनेता : आणि आता अजित पवार यांचे निधन. हे केवळ एका अनुभवी प्रशासकाचे किंवा प्रभावी राजकारण्याचे जाणे नाही; तर सत्ता, प्रशासन आणि जमिनीवरील वास्तव यांचा दुवा असलेला नेता हरपल्याची भावना आहे. निर्णयक्षमता, प्रशासनावर पकड आणि राजकीय गणिते सांभाळण्याची हातोटी यामुळे ते अनेकदा राज्याच्या राजकारणात निर्णायक ठरले. या सर्व नेत्यांचे अकाली जाण्याने झालेले हे नुकसान केवळ एका पक्षापुरते किंवा एका विचारधारेपुरते मर्यादित नाही. हे महाराष्ट्राच्या लोकशाही परंपरेचे, राजकीय संस्कृतीचे नुकसान आहे.
दुर्दैवी घटनांत देशाने गमावले राजकीय नेते
- राजेश पायलट (५५) (काँग्रेस) : ११ जून २००० - जयपूरजवळ कार अपघात.
- माधवराव सिंधिया (५६) (काँग्रेस) : ३० सप्टेंबर २००१ – उत्तर प्रदेशात विमान अपघात.
- प्रमोद महाजन (५६) (भाजप) : ०३ मे २००६ – मुंबईत हल्ल्यात मृत्यू.
- बालयोगी (५०) (तेदेपा) : ०३ मार्च २००२ – आंध्र प्रदेशात हेलिकॉप्टर कोसळले.
- राजशेखर रेड्डी (६०) (वायएसआर काँग्रेस) : २ सप्टेंबर २००९ – आंध्रात हेलिकॉप्टर अपघात
- साहिबसिंह वर्मा (६४) (भाजप) : ३० जून २००७ – जयपूर-दिल्ली हायवेवर कार धडकली.
- गोपीनाथ मुंडे (६५) (भाजप) : ३ जून २०१४– दिल्लीत कार अपघात.
- श्रीकांत जिचकार (४९) (काँग्रेस) : २ जून २००४– नागपूरजवळ कार बसला धडकली.
- के. येरेन नायडू (५५) (तेदेपा) : २ नोव्हेंबर २०१२ – आंध्रमध्ये रस्ते अपघातात निधन.
- मोहन कुमारमंगलम (५६) (काँग्रेस) : ३१ मे १९७३ – विमान अपघातात मृत्यू.