एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 06:13 IST2025-10-16T06:12:53+5:302025-10-16T06:13:08+5:30
बैठकीत अडसूळ यांच्या गटाचे संचालक बैठकीचे चित्रीकरण करीत होते. त्यांना गुणरत्न सदावर्ते गटाचे संचालक घाडगे यांनी विरोध केला.

एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एसटी महामंडळाच्या मुख्यालयात बुधवारी झालेल्या एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हाणामारी झाली. एका गटाचे संचालक बैठकीच्या चित्रीकरणास झालेल्या विरोधातून बाटलीफेक, शिवीगाळ आणि संचालकांमध्ये झटापट झडल्याचे समजते.
या बैठकीत अडसूळ यांच्या गटाचे संचालक बैठकीचे चित्रीकरण करीत होते. त्यांना गुणरत्न सदावर्ते गटाचे संचालक घाडगे यांनी विरोध केला. बैठकीतील माहिती बाहेर जाता कामा नये, असे घाडगे म्हणाले. त्यावर त्यांच्या शेजारी बसलेल्या एका सदस्याने तावातावाने उठून समोर बसलेल्या सदस्यांवर पाण्याची बाटली फेकून मारली. यावेळी दोन्ही गट शिवीगाळ करीत भिडले. या घटनेचा एक व्हिडीओही समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. या घटनेची नोंद नागपाडा पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
बैठक सुरू असताना भ्रष्टाचार, बेकायदा कामे आणि गैरवर्तणुकीच्या मुद्द्यावरून संचालकांमध्ये वाद निर्माण झाला. बाहेरून लोक बोलावून मारहाण केल्याचा आरोप दोन्ही गटांनी परस्परांवर केला आहे. यासंदर्भात एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तसेच बँकेचे अध्यक्ष माधव कुसेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला; मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
पळालो नसतो तर जीव गेला असता!
एसटी बँकेचे संचालक संतोष राठोड यांनी सांगितले की, दोन वर्षांपासून बँकेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार सुरू आहे. आम्ही सहकार आयुक्त आणि अध्यक्षांकडे तक्रारी केल्या आहेत. आज आम्ही पळून गेलो नसतो, तर आमचा जीव गेला असता. गुणरत्न सदावर्ते हे बँकेत घोटाळे करत असून, या हल्ल्यामागे त्यांचा हात आहे.
‘गैरव्यवहार लपवण्यासाठी गदारोळ’
एसटी कर्मचारी काँग्रेसनेही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे म्हणाले, चेअरमन आणि व्हाइस चेअरमन बैठकीला हजर नसल्याने राडा झाला. बँकेत बेकायदा भरती, संगणक खरेदी आणि पैशांची उधळपट्टी सुरू आहे. हे सर्व लपविण्यासाठी हा गदारोळ घातला आहे.
डेटा एन्ट्री कामात ३० कोटींचा भ्रष्टाचार!
एसटी कामगार संघटनेचे तसेच कृती समितीचे अध्यक्ष संदीप शिंदे म्हणाले, सदावर्ते गटाने जाणूनबुजून हा हल्ला केला. बाहेरून आणलेल्या लोकांनी सभागृहात गोंधळ घातला. भ्रष्टाचाराबद्दल प्रश्न उपस्थित केला, तेव्हा राडा घडवून आणला गेला. सौरभ पाटील एमडी असताना १२ कोटींच्या डेटा एन्ट्री कामात ३० कोटींचा भ्रष्टाचार झाला. हे उघड होऊ नये म्हणूनच पूर्वनियोजित हल्ला करण्यात आला.