रायगड रोपवेसाठी चार तासांची प्रतीक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 16:00 IST2025-06-18T15:58:48+5:302025-06-18T16:00:05+5:30

शिवप्रेमींची अलोट गर्दी; वाहन पार्किंगचा बिकट प्रश्न

Four-hour wait for Raigad Ropeway | रायगड रोपवेसाठी चार तासांची प्रतीक्षा!

रायगड रोपवेसाठी चार तासांची प्रतीक्षा!

महाड: किल्ले रायगडावर मंगळवारी शिवप्रेमींची गर्दी उसळली. यामुळे रायगड रोपवेला सुमारे चार-पाच तासांची प्रतीक्षा असल्याने पायी जाण्याला अनेकांनी पसंती दिली. रायगड पायथ्याशी वाहनांची संख्या वाढल्याने पार्किंगचा प्रश्न बिकट झाला. रायगड रोपवे ते रोपवे फाटा, रोपवे फाटा ते चित्त दरवाजापर्यंत दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. 

रायगड किल्ला, राजमाता जिजाऊंचे समाधीस्थळ असलेल्या पाचाड परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शिवप्रेमी मोठ्या संख्येने गडावर येत आहेत. त्यामुळे पाचाडपासून वाहनांच्या रांगा लागल्या असून, चित्तदरवाजा येथे वाहने पार्किंग करण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रायगड रोपवेला सुमारे चार तासांची प्रतीक्षा असल्याने पायी जाणाऱ्यांची संख्यादेखील वाढली. यामुळे चित्त दरवाजा येथे पर्यटकांची मोठी गर्दी दिसून आली. रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे चित्त दरवाजा या ठिकाणी वाहतूककोंडी होत असल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांना मोठा फटका बसत आहे.

रायगडाचा आणि परिसराचा विकास झपाट्याने होत असला तरी शासनाचे मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष आहे. या ठिकाणी संपादित जागेत किंवा टी पॉइंटजवळ वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे. यामुळे शिवप्रेमींची गैरसोय होणार नाही, स्थानिक व्यावसायिक सिराज सय्यद म्हणाले.

रस्ता रुंदीकरणाच्या कामाचा फटका
महाड-रायगड मार्गाचे रुंदीकरण झाले असले तरी पाचाड रोपवे फाटा ते चित्त दरवाजापपर्यंतचा मार्ग अद्याप अरुंद आहे. यामुळे या ठिकाणी दुतर्फा वाहने उभी करण्यात येतात. चित्त दरवाजा या ३ ठिकाणी वाहतूककोंडी होत असल्याने किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसदेखील अडकून पडत आहेत. याचा फटका ग्रामस्थांना बसत असून, अनेकवेळा पायी चालत जाण्याची वेळ नागरिकांवर येत आहे.

Web Title: Four-hour wait for Raigad Ropeway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.