फडणवीसांसाठी धावून आलेल्या चार अधिकाऱ्यांना सतावतेय भविष्याची चिंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 11:23 IST2019-12-03T10:33:06+5:302019-12-03T11:23:46+5:30
फडणवीसांच्या शपथविधीवेळी सक्रिय राहिलेले अधिकारी चिंतेत

फडणवीसांसाठी धावून आलेल्या चार अधिकाऱ्यांना सतावतेय भविष्याची चिंता
मुंबई: राज्यातील सत्ता नाट्य अखेर महिनाभरानंतर संपुष्टात आलं. मात्र या कालावधीत भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांच्या मदतीला धावून आलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आता भविष्याची चिंता सतावत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीसाठी मुख्य सचिव अजॉय मेहतांनी त्यांची सुट्टी रद्द केली. फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या शपथविधीसाठी मेहता चार्टर्ड प्लेननं मुंबईत दाखल झाले. त्यानंतर ते जवळपास दिवसभर राज भवनात उपस्थित होते. इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्स्प्रेसनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता २१ नोव्हेंबरपासून सुट्टीवर होते. अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे जबाबदारी सोपवून मेहता मुंबईबाहेर गेले होते. मात्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार शपथ घेणार असल्याची माहिती मिळताच त्यांनी सुट्टी रद्द केली. त्यानंतर त्यांनी चार्टर्ड प्लेननं मुंबई गाठली. मध्यरात्रीनंतर मुंबईत दाखल झालेले मेहता २३ नोव्हेंबरला सकाळी राजभवनात होते.
२३ नोव्हेंबरला सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. यावेळी मुख्य सचिव अजॉय मेहता यांच्यासह अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाचे अधिकारी, प्रधान सचिव आणि सचिव दर्जाचे अधिकारी राजभवनात उपस्थित होते. मात्र फडणवीसांचं सरकार अवघ्या ८० तासांमध्ये कोसळलं. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रं होती घेताच फडणवीस सरकारमधील प्रकल्पांना ब्रेक लावणारे काही निर्णय घेतले आहेत. त्यामुळे फडणवीसांच्या शपथविधीला उपस्थित राहिलेल्या आणि त्यावेळी अतिशय सक्रियपणे काम केलेल्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.