नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 13:49 IST2025-06-18T13:45:32+5:302025-06-18T13:49:57+5:30

Sudhakar Badgujar joins BJP: सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Former Shiv Sena (UBT) leader Sudhakar Badgujar joins BJP | नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!

नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!

मुंबई : माजी मंत्री बबनराव घोलप, नाशिकमधील उद्धवसेनेचे निलंबित नेते सुधाकर बडगुजर, माजी महापौर अशोक मुर्तडक आणि माजी महापौर नयना घोलप आदी नाशिकच्या नेत्यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. ‘या प्रवेशाबद्दल आपल्याला माहिती नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सकाळी म्हणाले पण दुपारी त्यांनी बडगुजर यांच्या गळ्यात कमळाचा दुपट्टा टाकून त्यांना प्रवेश दिला.

घोलप, बडगुजर, मुर्तडक आदी नेते नाशिकहून सकाळीच मुंबईच्या दिशेने निघाले तेव्हा बावनकुळे यांना माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी या प्रवेशाची आपल्याला कल्पना नसल्याचे सांगितले. नाशिकच्या भाजप आमदार सीमा हिरे यांनी बडगुजर यांच्या प्रवेशाला प्रचंड विरोध करणारी मोहीम गेले काही दिवस उघडली होती. बडगुजर यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने त्यांना पक्षात कोणत्याही परिस्थितीत पक्षात घेता कामा नये असे त्यांचे म्हणणे होते. मात्र, बडगुजर यांना पक्षात आणण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन विशेष आग्रही होते.

शेवटी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री महाजन यांच्या उपस्थितीत भाजपच्या प्रदेश कार्यालयात भाजप प्रवेशाचा कार्यक्रम झाला. बडगुजर यांच्यामुळे भाजपला नाशिकमध्ये मोठी ताकद मिळेल. स्थानिक नेत्यांनी आपसातील मनभेद आणि मतभेद बाजूला सारून महापालिका निवडणुकीत पक्षाच्या प्रचंड विजयासाठी एकत्र यावे, असे आवाहन बावनकुळे यांनी केले. महाजन यांनी नाशिक महापालिकेत शंभरवर जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला. घोलप, बडगुजर यांचीही भाषणे झाली.

दाऊदलाही घेणार का?- हर्षवर्धन सपकाळ
सुधाकर बडगुजर यांचे कुविख्यात दाऊद इब्राहिमचा हस्तक सलिम कुत्ता याच्याशी संबंध असल्याचे भाजप-शिंदेसेनेच्या नेत्यांनी विधानसभेत म्हटलेले होते. आज त्याच बडगुजर यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. आता दाऊद इब्राहिमलाही भाजपमध्ये घेणार का, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. भाजपा आमदार नितेश राणे यांनी विधिमंडळात नाशिकच्या सुधाकर बडगुजर यांनी दाऊदचा गुंड सलीम कुत्तासाठी पार्टी दिली होती असा गंभीर आरोप केला. पार्टीत नाचतानाचे फोटो विधानसभेत दाखवून कारवाईची मागणी केली होती त्याचे काय, असा सवाल त्यांनी केला.

Web Title: Former Shiv Sena (UBT) leader Sudhakar Badgujar joins BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.