अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 08:57 IST2025-04-29T08:57:05+5:302025-04-29T08:57:59+5:30
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील २ माजी मंत्री, २ माजी आमदार आणि काही बडे पदाधिकारी राष्ट्रवादी शरद पवार गट सोडून अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
जळगाव - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी राष्ट्रवादी शरद पवार गटाला जळगाव जिल्ह्यात मोठा धक्का बसणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री डॉ. सतीश पाटील हे २ मे रोजी तर माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त मंगळवारी होणाऱ्या एका बैठकीत ठरण्याची शक्यता आहे. देवकर यांच्यासोबत दोन माजी आमदार, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका यांच्यासह बरेच मोठे पदाधिकारी लवकरच अजित पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील २ माजी मंत्री, २ माजी आमदार आणि काही बडे पदाधिकारी राष्ट्रवादी शरद पवार गट सोडून अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले. डॉ. सतीश पाटील यांनी मंगळवारी पारोळा एरंडोल तालुक्यातील कार्यकर्त्यांचीही बैठक बोलावली आहे तर जिल्हा बँकेत पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या उपस्थितीत गुलाबराव देवकर, माजी आमदार कैलास पाटील, तिल्लोतमा पाटील यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या काही पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.
या बैठकीत देवकर यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरणार असल्याची माहिती आहे. या घडामोडींमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी जिल्ह्यात अजित पवार गटाला चांगले बळ मिळणार आहे. सध्या अनेक जण पक्षात येण्यासाठी इच्छुक आहेत. जिल्ह्यातील कोणत्या नेत्यांचा प्रवेश होणार, याबाबतचा सर्व निर्णय माजी मंत्री अनिल पाटील घेणार आहेत. अजित पवारांची वेळ घेऊन प्रवेशाचा अधिकृत निर्णय घेतला जाईल असं जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी म्हटलं आहे.
पक्षप्रवेशाला दिला दुजोरा
दरम्यान, अजित पवारांच्या उपस्थितीत २ मे रोजी मुंबई येथे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहोत. यासाठी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांशी मंगळवारी चर्चा करणार आहे. मात्र प्रवेश नक्की होणार असं माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी म्हटलं. तर अजित पवार गटात आपल्या प्रवेशाच्या तारखेबाबत मंगळवारी जिल्हा बँकेत बैठक होणार आहे. त्यानंतरच अधिकृत प्रवेशाची वेळ आणि तारीख सांगता येईल असं माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी सांगितले आहे.