खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 14:10 IST2025-08-25T14:08:26+5:302025-08-25T14:10:19+5:30
पक्षाच्या नियमांचे आणि धोरणांचे उल्लंघन केल्यामुळे तसेच पक्षविरोधी कार्य केल्यामुळे कारवाई

खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
मुंबई - खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर आणि ३ जणांची मनसेतून हकालपट्टी करण्याचे आदेश पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी काढले आहेत. मागील काही दिवसांपासून खेडेकर पक्षात नाराज असल्याची चर्चा होती. त्यात आज सकाळपासून वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर असून लवकरच ते मनसेला सोडचिठ्ठी देतील अशी चर्चा सुरू होती. मात्र त्याआधीच राज ठाकरे यांनी पक्षविरोधी कारवायांचे कारण देत वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी केली आहे.
मनसेच्या पत्रात म्हटलंय की, पक्षाच्या नियमांचे आणि धोरणांचे उल्लंघन केल्यामुळे तसेच पक्षविरोधी कार्य केल्यामुळे राज ठाकरे यांच्या आदेशाने खेडचे वैभव खेडेकर, राजापूरचे अविनाश सौंदळकर, चिपळूणचे संतोष नलावडे, माणगावचे सुबोध जाधव यांना पक्षातून बडतर्फ करण्यात येत आहे. या पत्रकावर मनसे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांची सही आहे.
सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार खालील पदाधिकाऱ्यांची पक्षविरोधी कारवाया आणि पक्षाच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे हकालपट्टी करण्यात आली आहे. तरी सर्व महाराष्ट्र सैनिकांनी याची नोंद घ्यावी.#MNSAdhikrutpic.twitter.com/paBgD7Ejcq
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) August 25, 2025
कोण आहेत वैभव खेडेकर?
वैभव खेडेकर हे राज ठाकरेंचे निष्ठावंत नेते म्हणून ओळख आहे. मनसेच्या स्थापनेपासून ते पक्षात कार्यरत होते. २०१४ साली त्यांनी दापोली विधानसभा निवडणूक लढवली मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. खेड नगरपरिषदेत मनसेची सत्ता आणण्यात वैभव खेडेकर यांचा महत्त्वाचा वाटा होता. यापूर्वी ते खेडचे नगराध्यक्ष राहिले होते. वैभव खेडेकर आणि रामदास कदम यांच्यातील संघर्ष बराच काळ सुरू होता. परंतु हा संघर्ष कमी करत रामदास कदमांनी खेडेकर यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. खेड आणि दापोली परिसरात वैभव खेडेकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. खेडेकर यांच्यावर सध्या मनसेच्या राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटकपदाची जबाबदारी आहे. परंतु गणेशोत्सवानंतर वैभव खेडेकर भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा जोर धरू लागली आहे.