तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 11:00 IST2025-09-10T10:59:31+5:302025-09-10T11:00:21+5:30
Solapur Crime News: तमाशातील नर्तकीच्या प्रेमात वेड्या झालेल्या एका माजी सरपंचाने तिच्या घरासमोरच कारमध्ये कोंडून घेत स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना सोलापूरमधील बार्शी तालुक्यातील सासुरे या गावात घडली.

तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
तमाशातील नर्तकीच्या प्रेमात वेड्या झालेल्या एका माजी सरपंचाने तिच्या घरासमोरच कारमध्ये कोंडून घेत स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना सोलापूरमधील बार्शी तालुक्यातील सासुरे या गावात घडली. मृत गोविंद बर्गे हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील एका गावातील माजी उपसरपंच होते. ३४ वर्षीय बर्गे हे विवाहित होते. तसेच त्यांच्या मागे पत्नी, मुलगी आणि मुलगा असं कुटुंब उरलं आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार गोविंद बर्गे यांना गेल्या काही काळापासून कलाकेंद्रात जाण्याचा छंद लागला होता. त्यातून त्यांची ओळख पूजा गायकवाड या २१ वर्षीय नर्तकीसोबत झाली होती. काही दिवसांनी ही ओळख प्रेमात रूपांतरीत झाली. दरम्यान, गोविंद बर्गे यांनी पूजा हिला काही महागड्या भेटवस्तूही दिल्या होत्या. त्यामध्ये एका महागड्या मोबाईलचाही समावेश होता. एवढंच नाही तर तो पूजा हिला अधूनमधून दागदागिनेही भेट द्यायचा.
मात्र एवढी मैत्री असूनही पूजा हिने गेल्या काही दिवसांपासून गोविंद बर्गे याला टाळण्यास सुरुवात केली होती. गेवराईतील बंगला आपल्या नावावर करण्याचा आणि भावाच्या नावावर पाच एकर जमीन देण्यासाठी पूजा हिने आग्रह धरला होता. एवढंच नाही तर आपल्या मागण्या पूर्ण न केल्यास अतिप्रसंग केल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी पूजा हिने गोविंद यांना दिली होती, असा आरोप गोविंद बर्गे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
दरम्यान, पूजा हिने बोलणं कमी केल्याने गोविंद बर्गे हे अस्वस्थ झाले होते. सोमवारी रात्री गोविंद बर्गे हे पूजा हिच्या घराजवळ आले होते. तिथून त्यांनी तिला वारंवार फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र पूजा हिने त्यांना काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे गोविंद यांचा स्वत:वरील संयम सुटला. त्यांनी आपला कार पूजा हिच्या घरासमोरच पार्क करत कारचे दरवाजे लॉक केले त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवले.
पूजा हिने दिलेली धमकी आणि पैशांसाठी लावलेल्या तगाद्यामुळे गोविंद यांनी जीवन संपवल्याचा आरोप करत गोविंद यांच्या मेहुण्यांनी पूजाविरोधात तक्रार दिली आहे. दरम्यान, गोविंद यांची मुलं लहान आहेत, असं टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी त्यांनी मुलांचा आणि आमचाही विचार करायला हवा होता, अशी खंत गोविंद यांच्या भावाने व्यक्त केली आहे.