आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 20:04 IST2025-12-20T18:42:27+5:302025-12-20T20:04:49+5:30
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचे आज निधन झाले.

आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Shalinitai Patil Passes Away: महाराष्ट्राच्या ज्येष्ठ नेत्या, माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पत्नी, माजी मंत्री, माजी खासदार डॉ. शालिनीताई पाटील यांचे शनिवारी दुपारी ३ वाजून ४८ मिनिटांनी माहीम मुंबई येथील ज्योती सदन या निवासस्थानी निधन झाले. त्या ९४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, दोन मुली, जावई, नातवंडे व परतवंडे असा परिवार आहे.
सत्यशोधक विचारांचे प्रणेते ज्योतिजीराव फाळके पाटील यांच्या त्या कन्या होत. त्यांनी कायद्याचे शिक्षण घेत वकिलीची पदवी घेतली होती. सांगली जिल्हा लोकल बोर्डाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी राजकीय कारकीर्दीस सुरुवात केली. विचारस्वातंत्र्य, सामाजिक न्याय आणि निर्भीड राजकीय भूमिका यासाठी ओळखल्या जाणाऱ्या डॉ. शालिनीताई पाटील यांनी आपल्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात वेगळी छाप उमटवली. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळख असलेल्या डॉ. शालिनीताई पाटील यांनी खासदार व आमदार म्हणून प्रभावी कामगिरी बजावली. राज्याच्या महसूल मंत्री म्हणून त्यांची कारकीर्द विशेष गाजली.
सांगली ते सातारा राजकीय प्रवास
दिवंगत शालिनीताई पाटील यांनी १९८५ मध्ये सांगली जिल्ह्यातून सातारा जिल्ह्याकडे राजकीय मार्गक्रमण केले. काही काळ त्या सातारारोड पाडळी स्टेशन या मूळगावी वास्तव्यास होत्या. चिमणगावच्या माळावर श्री जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची उभारणी करणे हा त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा ठरला. या कारखान्यासाठी परवाना मिळवताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला.
राजकीय विजय, पराभव आणि ठाम भूमिका
१९९९ मध्ये त्यांनी विधानसभेचे माजी सभापती व काँग्रेसचे दिग्गज नेते शंकरराव जगताप यांचा पराभव करत त्यांच्या २५ वर्षांच्या संसदीय कारकीर्दीला पूर्णविराम दिला. यानंतर त्यांनी कोरेगाव तालुक्यात स्वतःचा कारखाना गट उभा केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर त्यांनी खासदार शरद पवार यांच्याशी जुळवून घेत राष्ट्रवादीतून कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून विजय मिळवला. २००४ मध्ये त्यांनी पुन्हा विधानसभा निवडणुकीत विजय संपादन केला.
आर्थिक निकषावर आरक्षण : वादळी पण ठाम भूमिका
आर्थिक निकषावर आरक्षण या विषयावर पक्षश्रेष्ठी शरद पवार यांना न जुमानता त्यांनी आक्रमकपणे भूमिका घेतली. ती राष्ट्रवादीसाठी अडचणीची ठरली. त्यानंतर त्यांच्यात दरी पडली. यानंतर डॉ. शालिनीताई पाटील यांनी ‘क्रांतिसेना’ या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. यातून त्यांनी आर्थिक निकषावर आरक्षणाची भूमिका घेत मागासवर्गीय समाजाच्या विद्यमान आरक्षण धोरणावर आक्षेप नोंदवला.