माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 23:42 IST2025-11-15T23:41:01+5:302025-11-15T23:42:10+5:30
सातारा जिल्ह्यामधील ९ नगर पालिकांच्या निवडणुका २ डिसेंबर रोजी होऊ घातल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
प्रमोद सुकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
गेल्या काही दिवसापासून काँग्रेस पक्षाच्या कामानिमित्त दिल्लीत अडकून राहिलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बिहार निवडणूकीच्या निकालानंतर प्रथमच रविवार दि.१६ रोजी दुपारी कराडला येणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे उद्या रात्रीपर्यंत जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या बाबतीतली महत्त्वपूर्ण घडामोडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सातारा जिल्ह्यामधील ९ नगर पालिकांच्या निवडणुका २ डिसेंबर रोजी होऊ घातल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अर्ज दाखल करण्यासाठी फक्त दोन दिवस उरले आहेत.भाजपने या निवडणुकात अनेक ठिकाणी स्वबळाचा नारा देत 'कमळ' फुलवण्याचा डाव आखला आहे. अशावेळी त्याच्या विरोधात महाविकास आघाडीने एकत्रित उभे ठाकण्याची गरज अनेक राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत. त्याबाबत आज पावतो महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांच्या जिल्हास्तरावर ३/४ बैठका झाल्या.मात्र काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबतचा निर्णय पृथ्वीराज चव्हाणच घेतील अशी भूमिका मांडली. मात्र, ते येथे नसल्याने काही निर्णय होऊ शकलेले नाहीत.
दरम्यान रविवार दि. १६ रोजी दुपारी पृथ्वीराज चव्हाण कराड येथे त्यांच्या निवासस्थानी येणार आहेत.त्यामुळे दुपारपासून कराडमध्ये बरीच खलबते होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.