सहा वर्षांत पहिल्यांदाच गोदावरीला मोठा पूर, सोलापूर जिल्ह्यातील गावे पुन्हा पाण्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 12:16 IST2025-09-29T12:16:28+5:302025-09-29T12:16:54+5:30
छत्रपती संभाजीनगरमध्ये विक्रम, जायकवाडीत मोठी आवक, सतर्क राहण्याचा इशारा

सहा वर्षांत पहिल्यांदाच गोदावरीला मोठा पूर, सोलापूर जिल्ह्यातील गावे पुन्हा पाण्यात
छत्रपती संभाजीनगर/नाशिक : मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये शनिवारी रात्रीपासून रविवारी दिवसभर मुसळधार पावसाचा जोर होता. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत पूरपरिस्थीने दाणादाण उडविली. त्यामुळे पुन्हा अनेक गावांचा संपर्क तुटला असून वस्त्या-शिवारं जलमय झाली आहेत. सोलापूर, नंदुरबार, आणि अहिल्यानगर जिल्ह्यातही पावसाने पुन्हा कहर केला आहे. विदर्भात अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आले. राज्यात पाच जण बुडाले तर इतर दुर्घटनांमुळे तिघांचा मृत्यू झाला आहे.
मराठवाड्यात शनिवारी रात्रीतून विभागात १८९ मंडळांतर्गत येणाऱ्या ३८०० गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. हिंगोली, परभणी, नांदेड, धाराशिव, लातूर, बीड, जालना व छत्रपती संभाजीनगरमध्ये तुफान पाऊस झाला. सप्टेंबरमधील २८ दिवसांमध्ये विभागात ३६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी दिवस व रात्रीतून २८ सप्टेंबरच्या सकाळपर्यंत विभागात एकूण ५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक पाऊस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ११० मिमी कोसळला. या पाठोपाठ जालना ६२, बीड ६३, लातूर २५, धाराशिव ३९, नांदेड २६, परभणी ४४ तर हिंगोली जिल्ह्यात ५५ मिमी पाऊस रविवारी सकाळपर्यंत झाला. परभणी जिल्ह्यावर सलग तीन दिवसांपासून आभाळ कोसळत आहे. त्यामुळे अनेक भागात पूर परिस्थिती कायम आहे.
१४०० लोक अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध भागात पुरात अडकले होते. त्यांना विविध यंत्रणांच्या माध्यमातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे.
३०० वसाहतींना सोलापूर शहरातील पूर स्थितीचा फटका बसला आहे. आदिला नदीला पूर आल्याने अनेक भागातील घरे आणि बाजार परिसर जलमय झाला. परिणामी मोठे नुकसान झाले.
२७० जणांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या विविध भागातून पुरातून वाचविण्यात आले आहे. जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यातील रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद रविवारी झाली आहे.
९७.८० टक्के एवढा पाणीसाठा जायकवाडी धरणात साठला आहे. गोदाकाठावरील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. पूरबाधितांची व्यवस्था प्रशासनामार्फत शाळांमध्ये करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन गाव पातळीपर्यंत २४ तास सतर्क आहे.
गोदावरीच्या पुराने गाठली धोक्याची पातळी
नाशिक : मुसळधार पावसामुळे गोदामाई दुथडी भरून वाहू लागली आहे. सहा वर्षांत पहिल्यांदाच गोदावरीला मोठा पूर आला. पुराची तीव्रता दर्शविणाऱ्या पारंपरिक खुणांपैकी दुतोंड्या मारुतीची मूर्ती, सांडव्यावरील देवी मंदिर बुडाले होते. नारोशंकर मंदिरावरील घंटेच्या महिरपजवळ पुराची पातळी दुपारी पोहोचली. गंगापूरमधून दुपारी चार वाजेच्या सुमारास तब्बल १०,९९८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. या वेळी होळकर पुलाखालून पुढे १८,२३२ क्युसेक पाणी वाहू लागल्याने गोदावरी नदीने धोक्याची पातळी गाठली होती.
जळगाव : जिल्ह्यातही अनेक वस्त्या जलमय झाल्या आहेत. शेतात पाणी साचल्याने कपाशी, ज्वारी, मका व बाजरी पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. चाळीसगाव, पाचोरा आणि भडगाव या तीन तालुक्यांना पुन्हा एकदा तडाखा दिला. नांद्रा गावातील ९० कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे नंदुरबार तालुक्यात घरांचे नुकसान झाले, शेकडो हेक्टरवर पिकांची नासाडी झाली.
जायकवाडीतून २ लाख २६ हजार क्युसेकने विसर्ग
छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्व भागात शनिवारी रात्री मुसळधार पाऊस पडल्याने सुमारे ३ लाख क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारपासूनच प्रकल्पातून २ लाख २६ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. रात्री पुन्हा पाऊस न पडल्यास हा विसर्ग वाढणार नाही, यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांनी केले.
नेवासा तालुक्यात तीन जणांचा मृत्यू
अहिल्यानगर : नेवासा तालुक्यात चिलेखनवाडी, नेवासा खुर्द आणि जैनपूर येथे भिंत अंगावर कोसळून तसेच विजेचा धक्का लागून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर भिंत अंगावर पडून भानसहिवरा येथे दोन जण जखमी झाले आहेत. नेवासा तालुक्यात १५ जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत.
पोहण्याचा मोह बेतला जीवावर; चौघे बुडाले!
बुलढाणा : जिल्ह्यातील निमगाव (ता. नांदुरा) येथील ज्ञानगंगा नदी तसेच दसरखेड (ता. मलकापूर) येथील नळगंगा नदीपात्रात पोहण्यासाठी उतरलेले चार जण बुडाल्याची घटना रविवारी घडली आहे. यामध्ये दोन युवकांचा आणि दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
मुंबई : मराठवाडा, सोलापूर जिल्ह्यात पूरस्थितीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. धरणातून विसर्गापूर्वी संबंधित जिल्हा प्रशासनाला कळविण्यात यावे. पूरग्रस्त गावांमधील मदत शिबिरांमध्ये अन्नपाणी, जनावरांना चारा पुरविण्याचे आदेश त्यांनी दिले.
अहिल्यानगर जिल्ह्यात ५० गावांतील रस्ते बंद
अहिल्यानगर : जिल्ह्यात शनिवारी रात्री व रविवारी पहाटे ८३ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. पाण्यामुळे ५० गावांत रस्ते बंद करण्यात आले. राहाता तालुक्यात १२०० नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर केले, तर शेवगाव तालुक्यात १४० जणांची बोटीने सुटका केली आहे. अहिल्यानगर शहरात पुरात अडकलेल्या ५० जणांची सुटका केली. सीना नदीचे पाणी वस्त्यांमध्ये शिरले. अनेकांच्या घरात गेले. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या चोंडी (ता. जामखेड) येथील निवासस्थानाला सीना नदीचे पाणी लागले.
सीनेत विसर्ग, काठावरील गावे पुन्हा गेली पाण्यात
सोलापूर : सीना-कोळेगाव धरणातून रविवारी दिवसभरात पाण्याचा विसर्ग वाढत राहिला. सायंकाळी सहा वाजेपर्यंत सीना कोळेगाव धरणातून ९१ हजार २०० क्युसेकचा विसर्ग होता. इतर प्रकल्पांमधूनही विसर्ग होत असल्याने करमाळा, माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर तालुक्यात नदीकाठची गावे पुन्हा पाण्यात गेली आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील स्थिती
सातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणे भरल्याने विसर्गात वाढ करण्यात आली.
कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाची उघडीप; पण शिवारात अजूनही पाणी साचलेले.
सांगली : पावसाने उघडीप दिल्याने दिलासा, वारणा धरणाचे दरवाजे बंद.
रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा मुक्काम वाढला, ३० सप्टेंबरपर्यंत पाऊस.
विदर्भात नदी-नाल्यांना पूर
अकोला : अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. तिनही जिल्ह्यातील २७ हून अधिक महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सर्वच सिंचन प्रकल्प तुडुंब भरले असून, नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. प्रशासनाने गावांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यात चौथ्या दिवशी पावसाने दिलासा दिला. भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा आहे. गोंदियात धानपिकाला फटका बसला आहे.