डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 06:14 IST2025-09-24T06:13:45+5:302025-09-24T06:14:09+5:30

मराठवाड्यातील १२९ मंडळांत रेकॉर्डब्रेक अतिवृष्टी; सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव, नाशिक जिल्ह्यांतही हाहाकार, ७० लाख एकरांवरील पिकांचा चिखल, बांधा-बांधावर आसवांचा महापूर

Flood in Maharashtra: Marathwada, Solapur, Ahilyanagar, Jalgaon districts of the state have been literally devastated by heavy rains | डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर

डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर

गोविंद इंगळे

मुंबई : राज्यातील मराठवाड्यासह सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव जिल्ह्यांत गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अतिवृष्टीने अक्षरशः  हाहाकार माजवला आहे. सततच्या पावसामुळे नद्यांना पूर आले असून शेतात, घरात पुराचे पाणी शिरले आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून हाती आलेली पिके मातीमोल झाली आहेत. ‘भर पावसात उभे गाव ओस झाले...’ अशी स्थिती राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत पाहायला मिळते आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी यामुळे जोर धरू लागली आहे.  

नद्यांना पूर आल्याने शेती, घरे, जनावरे यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नागरी वस्त्यांमध्ये देखील पाणी शिरल्याने घरांचे आणि व्यवसायांचेही मोठे नुकसान झाले आहे. डोळ्यांदेखत शेतांमधील पिकांचे होत्याचे नव्हते झाल्याचे पाहून शेतकरी हवालदिल झाले आहेत. ‘गंगामाई पाहुणी आली, घरट्यात गेली राहून...’ अशी अवस्था झालेल्या शेतकऱ्यांचा कणा याही बिकट स्थितीत ताठ राहावा, यासाठी राज्य सरकारने तातडीने त्यांना मदत देऊन जगण्याची उभारी द्यावी, अशी मागणी होत आहे. 

पीक आठवू आठवू डोळ्यांतील पाणी वाहायचे थांबेना...

यंदा पाऊस काळ चांगला आहे म्हणून ऐकलं होतं. त्यामुळे हिंमत करून बँकेचे कर्ज काढले. कांदा लावला. द्राक्षही चांगले पैसे देईल वाटले. मात्र, एकाच पावसाने आमच्या स्वप्नांचा चुराडा केला. रानात नीट मातीही शिल्लक राहिली न्हाय. पावसापूर्वी जोमाने डोलणारे पीक आठवू आठवू डोळ्यांतील पाणी वाहायचे थांबेना, अशा शब्दांत चिंचपूर ढगे (जि. धाराशिव) येथील शेतकरी चंद्रकांत रामभाऊ मोरे यांनी आपली व्यथा मांडली. बाणगंगा नदीच्या पुरात त्यांची ३ एकर ३० गुंठे शेती खरडून वाहून गेली.  त्यांची १ एकर द्राक्षबाग, अर्धा एकर कांदा व २ एकर १० गुंठे सोयाबीन पूर्णतः नष्ट झाले. मोरे यांच्यावर १ लाख २५ हजार रुपयांचे बँकेचे कर्जही आहे.  

अडीच एकर शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह; आता जगावे कसे? 

“मायबाप सरकार, माझं कसं होणार? माझं कुटुंब काय खाणार?” असा हंबरडा गुंजरगा येथील कांता जीवन शिंदे या वृद्ध महिलेने फोडला. महापुरात त्यांच्या जनावरांसह सर्वस्व वाहून गेले. हताश होऊन त्यांनी तेरणा नदीत उडी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, गावातील काही युवकांच्या तत्परतेमुळे आजीबाईंचा जीव वाचला. तेरणा नदीच्या पुराचे पाणी शेतात व घरात शिरल्याने मोठे नुकसान झाले. कांताबाईंच्या शेळ्या, म्हशी, कोंबड्या वाहून गेल्या. शेती पाण्याखाली गेली. कुटुंबाचा उदरनिर्वाह कोलमडला. यातून बाहेर पडता येणार नाही, या नैराश्यातून त्यांनी थेट नदीकाठी धाव घेतली. कांताबाई शिंदे यांना दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार असून केवळ अडीच एकर शेत आहे. या शेतावर कुटुंबाचा उदरनिर्वाह आहे. त्यामुळे कुटुंब अडचणीत आल्याने आजीबाईंनी हा पवित्रा घेतला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

Web Title: Flood in Maharashtra: Marathwada, Solapur, Ahilyanagar, Jalgaon districts of the state have been literally devastated by heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.