मुंबई - महाराष्ट्रात अतिवृष्टीने मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
आज मंत्रिमंडळ बैठक होणार आहे त्याआधी विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे. राज्यात पावसाने झोडपून काढले आहे , अस असताना पालकमंत्री अजून जिल्ह्यात मध्ये आढावा घ्यायला गेले नाही. या आठवड्यात पावसाचा जोर वाढणार असा इशारा आहे त्यामुळे लोकांना, जनावरांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात यावे, गरज पडल्यास अतिरिक्त NDRF च्या टीम तैनात करण्यात यावा अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. पिकविम्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही, सरकारने निवडणुकीच्या आधीचा जो जीआर आहे त्यानुसार शेतकऱ्यांना मदत करावी. शेतकऱ्यांना जास्त मदतीची अपेक्षा असल्याने प्रति हेक्टरी ५० हजार रुपये देण्यात यावे ही मागणी वडेट्टीवर यांनी केली.
दरम्यान, काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने रविवारी रात्री आणि सोमवारी पहाटे मराठवाड्यात अक्षरश: कहर केला आहे. बीड, धाराशिव, हिंगोली, जालना जिल्ह्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. प्रकल्पांमधून विसर्ग सोडल्याने गावागावांमध्ये पाणी शिरले आहे. उरलीसुरली पिकेही खरडून निघाली आहेत. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने आजपर्यंत ५ हजार ३२० गावांतील पिकांचा चिखल केला. २२ सप्टेंबरला एकाच दिवसात तब्बल ७५ महसूल मंडळांत अतिवृष्टी होण्याचा यंदा विक्रम झाला आहे. दोन दिवसांत विविध जिल्ह्यात २२ गावांचा संपर्क तुटला. ७० जणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.