कल्याणमध्ये भर रस्त्यात सशस्त्र दरोड्याचा थरार
By Admin | Updated: March 29, 2017 00:00 IST2017-03-29T00:00:48+5:302017-03-29T00:00:48+5:30
सर्वांदेखत ६ जणांच्या सशस्त्र टोळक्याने केलेल्या हल्ल्यात पती-पत्नी जखमी

कल्याणमध्ये भर रस्त्यात सशस्त्र दरोड्याचा थरार
ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. 28 - कल्याणमध्ये भर रस्त्यात सशस्त्र दरोड्याचा थरार दुपारच्या सुमाराला घडला. सर्वांदेखत ६ जणांच्या सशस्त्र टोळक्याने केलेल्या हल्ल्यात पती-पत्नी जखमी झाले. लूट करून पसार झालेल्यांपैकी पोलिसांनी आतापर्यंत एकाला अटक केली असली तरी हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचा पोलिसांचा संशय आहे.
नंदा (वय ४०) आणि नारायण रमेश दत्ता (वय ४५) असे जखमी दाम्पत्याचे नाव आहे. हे दाम्पत्य शिव सह्याद्री सोसायटीत राहणारे आहे. जखमी नारायण दत्ता हे कापड व्यावसायिक आहे, सध्या त्यांच्यावर चैतन्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी जखमी अवस्थेत दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार कोळसेवाडी पोलिसांनी रंजन, आशिष पांडे, नसीम, सोनू नाककाट्या, कुमार उर्फ अण्णा आणि त्याचा साथीदार या हल्लेखोरांच्या विरोधात मंगळवारी रात्री सशस्त्र दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे
दत्ता दाम्पत्य दुपारी पावणे तीनच्या सुमारास स्कुटरवरून घरापासून जवळच असलेल्या कॉलेज समोरून जात होते. इतक्यात चॉपर, लोखंडी पाईप आणि फावड्याचे दांडे घेऊन आलेल्या टोळक्याने या दाम्पत्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात नारायण दत्ता गंभीर जखमी झाले आहेत. तर पत्नी नंदा हिलाही झोडपून तिच्या गळ्यातील १२ ग्रॅमची चेन लांबवण्यात आली.