फडतूस विरुद्ध काडतूस; उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस भिडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2023 07:16 AM2023-04-05T07:16:58+5:302023-04-05T07:17:25+5:30

हस्तांदोलनाच्या ‘तेराव्या’लाच कलगीतुरा

Flap vs. Cartridge; Uddhav Thackeray-Devendra Fadnavis clashed! | फडतूस विरुद्ध काडतूस; उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस भिडले!

फडतूस विरुद्ध काडतूस; उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस भिडले!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे/मुंबई/नागपूर: उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोन नेत्यांनी विधानभवनाच्या साक्षीने हसतहसत हस्तांदोलन केल्याच्या तेराव्या दिवशी दोघांमध्ये शाब्दिक राडा झाला. फडणवीस हे फडतूस गृहमंत्री असून, त्यांना गृहमंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी राजीनामा द्यावा, अशा शब्दांत ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत संताप व्यक्त केला. त्यावर, अडीच वर्षांच्या काळात ज्यांनी घरी बसून काम केले, त्यांनी आम्हाला राजकारण शिकवू नये. आम्ही तोंड उघडले तर त्यांना पळता भुई थोडी होईल, असे फडणवीस यांनी ठाकरेंना ठणकावले. त्यातच फडणवीस फडतूस नाहीत, ते काडतूस आहेत, असे म्हणत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी वादाला फोडणी घातली. तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा अशी टीका केली तर भाजप तुम्हाला घराबाहेर पडू देणार नाही, तुम्हाला कायमचे घरकोंबडा व्हावे लागेल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

या कलगीतुऱ्याला निमित्त ठरले  ठाण्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन रोशनी यांची भेट घेतली. त्यानंतर ते पोलिस आयुक्तांकडे तक्रार करण्यासाठी गेले होते. मात्र, पोलिस आयुक्त जागेवर नसल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली व ते फडणवीसांवर बरसले. त्यावर फडणवीसांनी नागपुरातून म्हणजे होमपिचवरून जोरदार प्रत्युत्तर दिले.

ही तर फडणवीसगिरी: उद्धव ठाकरे

  • फडणवीस हे उपमुख्यमंत्री पदासाठी लाळघोटेपणा करत आहेत. महिलांचा सन्मान केवळ बोलून होत नाही. ज्यांच्या नावाने (स्वा.सावरकर) तुम्ही यात्रा काढताय, त्यांच्यासारखे वर्तन करा असे सुनावतानाच उद्धव ठाकरे यांनी ठाण्याचे पोलिस आयुक्त हे पक्षपाती असल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी ठाकरे यांनी केली.
  • उपमुख्यमंत्रिपद मिळाले म्हणून फडणवीसगिरी करणारा हा माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय. फडणवीसांच्या घरावर काही आले तर लगेच एसआयटी नेमली जाते. बाजूच्या राज्यात जाऊन अटक होते. मिंधे गटाविरुद्ध फडणविसी दाखवण्याची हिंमत नाही. 
  • राज्यात गुंडगिरीचे राज्य आहे. यांना मुख्यमंत्री म्हणायचे की गुंडमंत्री म्हणायचे हे लोक ठरवतील. त्यांनी गुंडमंत्री असे पद निर्माण करून गुंड पोसण्याचे काम त्या मंत्र्याकडे द्यावे. ठाण्यात आता महिला गुंडांचीही गँग तयार होऊ लागली आहे. आम्ही आमच्यावरील संस्कारामुळे शांत आहोत, पण जर ठरविले तर एका क्षणात ठाणेच काय तर महाराष्ट्रातील गुंडगिरी उपटून काढू शकतो, असा इशाराही ठाकरे यांनी दिला. यापूर्वी भाजपच्या ठाण्यातील पदाधिकाऱ्याला शिंदे गटाच्या नेत्यांनी मारहाण केली तेव्हाही ठोस कारवाई झाली नाही, असे ठाकरे म्हणाले.

मी फडतूस नाही काडतूस, झुकेगा नही तो घुसेगा : फडणवीस

  • ‘काँग्रेस नेते राहुल गांधी महाराष्ट्रासह देशाचे श्रद्धास्थान असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात आणि उद्धव ठाकरे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. उद्धवा, काय होतास तू, काय झालास तू, असा कसा वाया गेलास तू? उद्धव मला फडतूस गृहमंत्री म्हणतात, मात्र मी फडतूस नाही काडतूस आहे. झुकेगा नही तो घुसेगा’, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. नागपुरात सावरकर गौरव यात्रेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
  • तत्पूर्वी दुपारी ते म्हणाले, ‘अडीच वर्षांचा त्यांचा कारभार बघितल्यानंतर नेमके फडतूस कोण आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. दोन दोन मंत्री तुरुंगात गेल्यावरदेखील त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत ज्यांनी दाखविली नाही, त्यांना बोलण्याचा अधिकारच नाही. ज्यांच्या काळात पोलिस खंडणीबाज झाले, त्यांना बोलण्याचा अधिकारच काय, आम्ही तोंड उघडले तर त्यांना पळता भुई थोडी होईल.
  • राज्याचा गृहमंत्री असल्याने अनेक लोकांना अडचण होत असून, ते देव पाण्यात ठेवून बसले आहेत. मी कुठल्याही स्थितीत हे पद सोडणार नाही. चुकीचे काम करेल, त्याला 
  • तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. कुठल्याही घटनेची निष्पक्ष चौकशी सरकार करेल.
  • पंतप्रधान मोदी यांचे फोटो लावून ते निवडून आले व त्यानंतर खुर्चीसाठी लाळघोटेपणा केला. खरा फडतूस कोण हे सर्वांनाच माहिती आहे. मी नागपूरचा आहे. ते ज्या भाषेत बोलले त्याहून खालची भाषा मला येते. पण, माझी तसे बोलण्याची पद्धत नाही’, असे ते म्हणाले.

Web Title: Flap vs. Cartridge; Uddhav Thackeray-Devendra Fadnavis clashed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.