आधी RSSचे कौतुक, आता CM फडणवीसांशी फोनवर चर्चा; शरद पवारांच्या मनात नेमके काय? चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 09:50 IST2025-01-12T09:49:03+5:302025-01-12T09:50:38+5:30
Sharad Pawar Call To CM Devendra Fadnavis: शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवरून १५ मिनिटे चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

आधी RSSचे कौतुक, आता CM फडणवीसांशी फोनवर चर्चा; शरद पवारांच्या मनात नेमके काय? चर्चांना उधाण
Sharad Pawar Call To CM Devendra Fadnavis: २०२४मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शपथ घेतली. यातच अनेक मुद्द्यांवरून विरोधक महाविकास आघाडीने महायुती सरकारला घेरण्याचा प्रयत्न कायम ठेवला आहे. अलीकडेच शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSSचे सलग कौतुक केले. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे समजते. यानंतर आता अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.
गेल्या काही दिवसांत शरद पवार यांनी सलग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाच्या कार्यप्रणालीचे कौतुक केले. विधानसभा निवडणुकीत संघाने केलेल्या कार्याची दखल घेत कौतुकोद्गार काढले. एकीकडे संघाचे कौतुक करत असताना मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही खासदारांना संपर्क साधला गेल्याची चर्चा, शरद पवारांनी केलेले RSSचे कौतुक यांमुळे राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून सुमारे १५ मिनिटे चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे.
शरद पवारांच्या मनात नेमके काय? चर्चांना उधाण
मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात महाराष्ट्रातील परिस्थितीबाबत चर्चा झाली. शरद पवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केली. बीड आणि परभणी येथील परिस्थितीवर चर्चा झाली. हा भाग शांत झाली पाहिजे. आमचे राजकीय विचार वेगळे असले तरी महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. एकट्या मुख्यमंत्र्यांची ती जबाबदारी नाही, असे शरद पवार यांनी सांगितले. दोन्ही नेत्यांमध्ये १५ मिनिटे चर्चा झाली. बीड, परभणी कस शांत करता येईल, हे पहिले पाहिजे. मी इथे येण्याआधी मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा केली आहे. अशांत महाराष्ट्र असे चित्र राज्यात होवू द्यायचे नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. यानंतर बीड आणि परभणी शांत होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. बीड जिल्ह्यात समाजात दुफळी दिसत आहे. त्यामुळे सरकारचा प्रयत्न आहे की हा भाग शांत झाला पाहिजे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, हा सरकारचा प्रयत्न आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीत बोलताना सांगितले.
शरद पवार हे अतिशय चाणाक्ष नेते आहेत
शरद पवार सातत्याने संघाचे कौतुक करत असून, भाजपा व शरद पवारांची जवळीक वाढत आहे का, असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आला होता. यावर बोलताना, शरद पवार हे अतिशय चाणाक्ष नेते आहेत. त्यांनी निश्चितच अभ्यास केला असेल की, त्यांनी लोकसभेच्या वेळी एवढे मोठे वायू मंडळ तयार केले होते. परंतु, ते एका मिनिटात पंक्चर कसे काय झाले? ते वायूमंडळ पंक्चर करणारी शक्ती कोण आहे? त्यांच्या लक्षात आले की, ही शक्ती नियमित राजकारण करणारी शक्ती नाही. तर राष्ट्रकारण करणारी शक्ती आहे. शेवटी कधीतरी प्रतिस्पर्ध्याचे कौतुक करावे लागते, त्या हिशोबाने त्यांनी संघाचे कौतुक केले असेल, असे मला वाटते, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.