राज्यातील महिला उद्योजकांसाठी पहिले स्वतंत्र इंक्युबेशन सेंटर एसएनडीटी विद्यापीठात... !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 04:18 PM2021-01-23T16:18:04+5:302021-01-23T16:23:46+5:30

महिला उद्योजकतेला चालना मिळणार, नवाब मलिक यांचा विश्वास

The first independent incubation center for women entrepreneurs in the state maharashtra at SNDT University | राज्यातील महिला उद्योजकांसाठी पहिले स्वतंत्र इंक्युबेशन सेंटर एसएनडीटी विद्यापीठात... !

प्रातिनिधीक छायाचित्र

googlenewsNext
ठळक मुद्देमहिला उद्योजकतेला चालना मिळणार, नवाब मलिक यांचा विश्वास महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचं काम विद्यापीठातून होणार

राज्यातील महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी कौशल्य विकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमध्ये स्वतंत्र ‘महिला उद्योजकता कक्ष’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सोसायटीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमधील ३० टक्के निधी महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी वापरणे, विद्यार्थीदशेतच महिलांना उद्योजकतेचे प्रशिक्षण देण्यासाठी विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये ‘विद्यार्थिनी उद्योजकता क्लब’ स्थापन करणे असे विविध उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. याचाच एक भाग म्हणून राज्यातील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाला (एसएनडीटी विद्यापीठ) महिलांकरिता पहिले आणि एक स्वतंत्र इंक्युबेशन सेंटर म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत उद्योजकतेला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह, महाराष्ट्र स्टार्टअप आणि इनोव्हेशन यात्रा, नवउद्योजकांना पेटंट मिळविण्यासाठी तसेच गुणवत्ता परिक्षणासाठी आर्थिक सहाय्य योजना अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. आता यापुढे या सर्व उपक्रमांमध्ये महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येणार असून याची सुरुवात एसएनडीटी महिला विद्यापीठातून होणार आहे.

एसएनडीटी हे भारतातील पहिले महिला विद्यापीठ असून महाराष्ट्रातील एकमेव शासकीय महिला विद्यापीठ आहे. त्यामुळे महिला उद्योजकतेला चालना देण्याचा श्रीगणेशा करण्यासाठी याहून उत्तम पर्याय नसल्याचे मत कौशल्य विकास विभागामार्फत नोंदविण्यात आले. महिलांचे नेतृत्व असलेल्या स्टार्टअप्सना प्रारंभिक टप्प्यात मार्गदर्शन करणे, अर्थ सहाय्य करणे, विकसीत स्टार्टअप्सना अधिकृत निधीकरिता स्टार्टअप परिसंस्थेतील गुंतवणूकदारांशी समन्वय साधून देणे, संशोधन व विकास क्षेत्रात तसेच तांत्रिक उद्योजकता क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या महिलांना विशेष अनुदान पुरविणे, विकसीत स्टार्टअप्सच्या विस्तृतीकरणासाठी व त्यांच्या उद्योगास चालना देण्यासाठी विविध एक्सलरेटर कार्यक्रम राबविणे इत्यादी करिता हे  इंक्युबेशन सेंटर काम करणार असल्याची माहिती एसएनडीटी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


या उपक्रमाने नक्कीच महिला उद्योजकतेला चालना मिळेल व देशात महाराष्ट्र एक उदाहरण प्रस्तापित केले जाईल. महिलांना यामधून आत्मनिर्भर होण्याची संधी मिळेलच शिवाय उद्योगांमधील , संशीधनं,ढील त्यांचा टक्का वाढण्यास मदत होईल.
नवाब मलिक , कौशल्य विकास विभाग मंत्री
 

Web Title: The first independent incubation center for women entrepreneurs in the state maharashtra at SNDT University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.