पहिली ते चौथी दिवाळीनंतर! शिक्षणमंत्री अनुकूल; मुख्यमंत्री लवकरच घेणार निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 07:05 AM2021-10-23T07:05:23+5:302021-10-23T07:21:57+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सशी चर्चा केल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

first to fourth standard classes to open after diwali says varsha gaikwad | पहिली ते चौथी दिवाळीनंतर! शिक्षणमंत्री अनुकूल; मुख्यमंत्री लवकरच घेणार निर्णय

पहिली ते चौथी दिवाळीनंतर! शिक्षणमंत्री अनुकूल; मुख्यमंत्री लवकरच घेणार निर्णय

Next

मुंबई : पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले असल्याने आता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग दिवाळीनंतर सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सशी चर्चा केल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

राज्यातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी घेतली. यावेळी सर्वच अधिकाऱ्यांनी पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याची विनंती केली. तसेच पाचवी ते बारावीपर्यंतच्या वर्गांमध्ये विद्यार्थी येण्याचे प्रमाण वाढत असल्याचे नमूद केले. काही अधिकाऱ्यांनी सांगितले की, वर्ग प्रत्यक्ष सुरू झाले नसले तरी चौथीपर्यंतचे विद्यार्थी शाळांमध्ये येऊन बसत आहेत. त्यांना शिकवलेदेखील जात आहे.

वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, चौथीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा आग्रह बहुतेक सर्वच सीईओंनी धरला. पाचवी ते बारावी सुरू झाल्यापासून तेथे कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन केले जात आहे. पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करतानाही वेगळ्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील. टास्क फोर्सशी चर्चा करून त्याबाबत निर्णय घेण्यात येईल. शिक्षण विभागाचे अधिकारी, विविध संस्थाचालकांशी मी लवकरच चर्चा करणार आहे. बैठकीला शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा उपस्थित होत्या. 

लातूरचे सीईओ अभिनव गोयल यांनी यावेळी ‘मिशन बाला ५००’ची माहिती दिली. त्या ठिकाणी लोकवर्गणीतून आनंददायी वातावरण शाळांमध्ये तयार करण्यात आले आहे. नाशिक जिल्हा परिषदेने ओट्यावरची शाळा हा उपक्रम राबवून कोरोना काळातही प्रत्यक्ष शिक्षण सुरू ठेवले, अशी माहिती सीईओ लीना बनसोड यांनी दिली. 

या जिल्हा परिषदांनी राबविले अभिनव उपक्रम
सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळा बंद असताना त्यांची दुरवस्था झाली होती. शासकीय यंत्रणा, लोकवर्गणी, शाळा समित्यांच्या सहकार्याने त्या नीट, स्वच्छ करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. 
त्या सर्व शाळांची रंगरंगोटीही करण्यात आली आहे, असे सोलापूर जि.प.चे सीईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.

Read in English

Web Title: first to fourth standard classes to open after diwali says varsha gaikwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.