कोळसा संकटाने राज्यात वीज उत्पादन ठप्प होण्याची भीती; केवळ दोन दिवसांचा स्टॉक उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 09:13 IST2021-09-24T09:13:09+5:302021-09-24T09:13:38+5:30
तीन दिवसांपेक्षा कमी कोळशाचा स्टॉक असेल तर वीज केंद्रासाठी अतिसंवेदनशील स्थिती मानली जाते. राज्यातील सर्व वीज केंद्रे सध्या या श्रेणीत आली आहेत.

कोळसा संकटाने राज्यात वीज उत्पादन ठप्प होण्याची भीती; केवळ दोन दिवसांचा स्टॉक उपलब्ध
नागपूर: राज्यातील औष्णिक वीज केंद्रांमध्ये भीषण कोळसा संकट निर्माण झाले आहे. अर्धा ते दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा उपलब्ध असल्याने राज्यातील वीज केंद्रे संवेदनशील स्थितीत पोहोचली आहेत. राज्यातील चार युनिटचे उत्पादन कोळसा नसल्याने ठप्प पडले असून, कोराडी औष्णिक वीज केंद्रातील ६६० मेगावॅट क्षमतेचे युनिट क्रमांक ६ कधीही बंद होऊ शकते.
तीन दिवसांपेक्षा कमी कोळशाचा स्टॉक असेल तर वीज केंद्रासाठी अतिसंवेदनशील स्थिती मानली जाते. राज्यातील सर्व वीज केंद्रे सध्या या श्रेणीत आली आहेत. महाजेनको सूत्रानुसार, वेकोलिकडून अनेक दिवसांपासून अपेक्षित १८ रॅकऐवजी केवळ १० रॅकचा पुरवठा होत आहे. सर्व कोळसा कंपन्यांमधून दररोज २५ रॅक कोळशाचा पुरवठा अपेक्षित असतो. परंतु सध्या सरासरी १८ रॅक मिळत आहेत. यामुळे केंद्रांमधील स्टॉक कमी होत आहे.
ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाल्याने कोळसा उत्पादन प्रभावित झाले. वाहतुकीतही समस्या येत आहे. त्यामुळे स्टॉक कमी होत चालला आहे. सध्या रोजच्या पुरवठ्यावर भागवले जात आहे.
गुरुवारी विजेची मागणी १८,०३७ मेगावॅट होती. ही पूर्ण करण्यात आल्याचा दावा महावितरणने केला. परंतु भविष्यात संकट उभे राहू शकते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. प्रशासनाने वेळीच हालचाल केली नाही तर विजेची समस्या उभी राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वीज केंद्रातील कोळशाची स्थिती
केंद्र उपलब्ध स्टॉक
खापरखेडा ०.५ दिवस
कोराडी २ दिवस
चंद्रपूर १.५ दिवस
नाशिक १.५ दिवस
पारस १.२५ दिवस
परळी १.७५ दिवस
भुसावळ १ दिवस
एनटीपीसी, खासगी क्षेत्रही होणार प्रभावित
कोळसा संकटामुळे मौदा येथील एनटीपीसी केंद्रातील एक युनिट ठप्प आहे. खासगी क्षेत्रही प्रभावित झाले आहे. अदानीच्या तिरोडा वीज केंद्रातील उत्पादन घटले आहे. रतन इंडियाचे एक युनिट व सीजीपीएलची दोन युनिट बंद करावी लागली. दुसरीकडे गॅसआधारित उरण प्रकल्पातील एक युनिट गॅस नसल्याने बंद आहे.
बंद पडलेले युनिट
कोळसा नसल्याने चंद्रपूर येथील युनिट क्रमांक ४, नाशिक येथील युनिट क्रमांक ५ व खापरखेडा येथील युनिट क्रमांक १ व २ बंद पडले आहे. कोराडीतील एक युनिट आपत्कालीन कारणांमुळे बंद आहे.