शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 05:55 IST2025-09-30T05:54:39+5:302025-09-30T05:55:04+5:30
आज मंत्रिमंडळ बैठकीत काय होणार? : आपत्तीग्रस्तांसाठी कोणकोणते निर्णय होणार? किती, कधी, कशी नुकसान भरपाई मिळणार?

शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
पुणे : राज्यात अनेक ठिकाणी गेल्या महिनाभरात अतिवृष्टीने हाहाकार माजवला असून, शेतकऱ्यांच्या स्वप्नांची अक्षरशः माती झाली. बीड, जालना, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, यवतमाळ या जिल्ह्यांना एकट्या सप्टेंबर महिन्यात मोठा तडाखा बसला आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे क्षेत्र वाढत आहे. सप्टेंबर महिन्यात तब्बल २६ लाख हेक्टरचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले. त्यात बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत प्रत्येकी पावणेसहा लाख हेक्टरपर्यंत नुकसान झाले आहे. त्या खालोखाल जालना आणि सोलापूर जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. हे अंदाजित नुकसान २७ सप्टेंबरपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे झाले असल्याचे कृषी विभागाने सांगितले. परिणामी, आता संपूर्ण खरिपात नुकसान झालेले क्षेत्र तब्बल ५२ लाख हेक्टरवर पोहोचले आहे.
अतिवृष्टी, महापूर आणि नुकसान या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक मंगळवारी होत असून खरडून गेलेली शेती, दयनीय अवस्था झालेले शेतकरी, सर्वस्व गमावलेले लोक यांना कोणता दिलासा देणार याकडे डोळे लागले आहेत. निकष बाजूला ठेवून वाढीव मदत देण्याची भूमिका जाहीर केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
यंदाचे शेतीचे नुकसान (हेक्टरमध्ये)
जून १.३४ लाख
जुलै १.४४ लाख
ऑगस्ट २४.४४ लाख
सप्टेंबर २६ लाख
पुरामुळे राज्यात ४१ हजार नागरिकांचे स्थलांतर
अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे राज्यात तब्बल ४१,०६७ नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. १४७ निवारा केंद्रे स्थलांतरितांसाठी राज्यभरात उभारण्यात आली आहेत. ७५निवारा केंद्रे एकट्या सोलापूर जिल्ह्यात आहेत.
पूरग्रस्तांना पायावर उभे करणार : मुख्यमंत्री
यवतमाळ : राज्यातील २५ लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे मिशन सुरू आहे. पुढील दोन-तीन वर्षांत हे उद्दिष्ट पूर्ण झाल्यावर ५० लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणू, असे सांगत पुरामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीद्वारे पुन्हा स्वत:च्या पायावर उभे करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती समारोहात ते बोलत होते. राज्यपाल आचार्य देवव्रत नैसर्गिक शेतीचे तज्ज्ञ आहेत. त्यांचे मॉडेल राज्यात पुढे नेऊन अडचणीतील शेती व शेतकऱ्याला बाहेर काढू, असेही मुख्यमंत्री म्हणाले.