...जेव्हा शेतकरी आमदाराच्या गळ्यात पडून ढसाढसा रडतात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 12:20 IST2019-11-04T10:34:19+5:302019-11-04T12:20:36+5:30
विदारक परिस्थिती बघून मंत्र्यांचेही डोळे पाणावले नसतील, तर नवल.

...जेव्हा शेतकरी आमदाराच्या गळ्यात पडून ढसाढसा रडतात
- श्यामकुमार पुरे
सिल्लोड : दोन दिवसांपूर्वी परतीच्या पावसाने तालुक्यातील पिके वाया गेली, शेतात गुडघाभर पाणी साचले, घरे पडली. शेतकरी हतबल झाले असून मदतीसाठी कोणी तरी येईल, अशी चातकासारखी वाट बघत गावोगावच्या शेतकऱ्यांचे डोळे रस्त्याकडे लागले असतानाच गेवराई सेमी येथे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार अब्दुल सत्तार, चंद्रकांत खैरे यांच्या गाड्यांचा ताफा रात्री ८ वाजेच्या सुमारास तेथे पोहोचला. तेव्हा तेथील शेतकरी बापू घुगे, सिल्लोड मुरलीधर कापडे, हरिदास ताठे हे सतार यांचे पालकमंत्री व आमदार सत्तार यांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडले.
राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहेत. त्यामुळे नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधी राज्यभर दौरे करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे जिल्ह्यातील विविध गावात जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्याचे प्रयत्न करत आहे. रविवारी सिल्लोडच्या गेवराई सेमी येथे एकनाथ शिंदे व स्थानिक आमदार अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली.
मात्र मंत्र्यांचा ताफा येताच गेवराई सेमी येथील शेतकरी बापू घुगे, मुरलीधर कापडे, हरिदास ताठे हे आमदार अब्दुल सत्तार यांच्या गळ्यात पडून ढसा ढसा रडले. साहेब आम्ही बरबाद झालो...पिके वाया गेली... घरे पडली... अतिवृष्टीने होते नव्हते ते सारे हिरावून घेतले. आता तुम्हीच आमचे मायबाप... काहीही करा: पण आम्हाला या संकटातुन सावरा अशी विनवणी शेतकरी करीत होते. ही विदारक परिस्थिती बघून मंत्र्यांचेही डोळे पाणावले नसतील, तर नवल.
यावेळी पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. धीर धरा, घाबरू नका. आत्महत्येसारखा विचारही मनात आणू नका. आम्ही तुमच्यासोबत आहोत. नुकसानभरपाईसाठी १० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गरज पडली तर सरकारला पैशाची तरतूद करण्यास भाग पाडू. नुकसानभरपाईचे फोटो तुम्ही शासनाच्या वेबसाईटवर अपलोड करा. प्रत्येकाला नुकसानभरपाई मिळवून देऊ, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.