"फडणवीस यांच्या सरकारमध्ये शेतकरी संकटात; शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अन्यथा लढा आणखी तीव्र करू’’, काँग्रेसचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 18:39 IST2025-05-21T18:38:09+5:302025-05-21T18:39:59+5:30
Harshwardhan Sapkal News: फडणवीस यांच्या सुलतानी सरकारमध्ये शेतकरी संकटात आहे, असा आरोप करत शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अन्यथा लढा आणखी तीव्र करू असा इशारा हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.

"फडणवीस यांच्या सरकारमध्ये शेतकरी संकटात; शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अन्यथा लढा आणखी तीव्र करू’’, काँग्रेसचा इशारा
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज शेतकऱ्यांच्या होत असलेल्या अनास्थेच्या मुद्द्यावरून राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर जोरदार टीका केली. फडणवीस यांच्या सुलतानी सरकारमध्ये शेतकरी संकटात आहे, असा आरोप करत शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अन्यथा लढा आणखी तीव्र करू असा इशारा हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली अमरावतीत भव्य ट्रॅक्टर मोर्चा व तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, इकडे राज्यातील शेतकरी मात्र संकटात आहे, सरकारचे त्याकडे लक्ष नाही, कृषी मंत्री शेतकऱ्यांना भिकारी म्हणून अपमान करत असतात. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे तूर १२ हजार रुपयावरून ६ हजार रुपये झाली आहे. कारण शेतकऱ्याची तूर बाजारात येत असताना केंद्रातील भाजपा सरकारने तूर आयात करून भाव पाडले. सोयाबिन ४ हजार रुपयांच्या वर जात नाही, शेतमालाला भाव नाही. पीक कर्ज मिळत नाही म्हणून शेतकऱ्याला सावकारच्या दारात उभे रहावे लागत आहे. या परिस्थितीला फडणवीसांचे सुलतानी सरकार जबाबदार आहे.
काँग्रेसच्या आजच्या ट्रॅक्टर रॅलीने आंधळ्या, बहिऱ्या सरकारचे डोळे उघडतील अशी आशा आहे पण सरकारने बळीराजाला नाडवले, शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही केली आणि शेतमालाला योग्य भाव मिळला नाही तर हा लढा आणखी तीव्र करू आणि त्यानंतर जो परिणाम होईल त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिला आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व राज्याचे सहप्रभारी कुणाल चौधरी व माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी यावेळी केंद्र व राज्यातील भाजपा सरकारवर हल्लाबोल केला. संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, जय जवान, जय किसान, अशा घोषणा या रॅलीत देण्यात आल्या.
राज्यभर काँग्रेसची "तिरंगा यात्रा"..
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आज राज्यभर सर्व जिल्हा व तालुक्यात तिरंगा यात्रा काढून ‘ऑपरेशन सिंदूर’ मधील वीरांना अभिवादन करण्यात आले. ‘जरा याद करो कुर्बानी’ या प्रेरणादायी संकल्पनेतून ही तिरंगा यात्रा काढण्यात आली. काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक या यात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित होते.