महसूल अधिकाऱ्यांपुढेच शेतकऱ्याने विष घेतले!
By Admin | Updated: June 6, 2015 01:27 IST2015-06-06T01:27:39+5:302015-06-06T01:27:39+5:30
न्यायालयाच्या आदेशानुसार शेताचा ताबा घेण्यासाठी आलेल्या महसूल अधिकाऱ्यांपुढेच शेतकऱ्याने विष प्राशन केले.

महसूल अधिकाऱ्यांपुढेच शेतकऱ्याने विष घेतले!
अकोलाबाजार (यवतमाळ) : न्यायालयाच्या आदेशानुसार शेताचा ताबा घेण्यासाठी आलेल्या महसूल अधिकाऱ्यांपुढेच शेतकऱ्याने विष प्राशन केले. यवतमाळ तालुक्यातील घाटाना (लोणी) येथे शुक्रवारी दुपारी हा प्रकार घडला.
विषप्राशन केलेल्या बाबूलाल राठोड (६०) यांच्यावर यवतमाळमधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लोणी (रोहणा) शिवारातील सर्वे नं. १० मधील शेताचे वाटप १९९१ मध्ये २३ भूमिहिनांना करण्यात आले होते. लाभार्थ्यांना सातबारा मिळाला. मात्र ताबा मिळाला नव्हता. त्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. खंडपीठाने १३ जानेवारी २०१५ रोजी या शेतकऱ्यांना शेताचा ताबा देण्याचा आदेश दिला. त्यानुसार शुक्रवारी मंडळ अधिकारी एस. ए. राणे, तलाठी चौधरी, वडगाव (जंगल) पोलीस ठाण्याचे ठाणेदार जी. एस. खारडे आदी शेतात पोहोचले.
मनोहर राठोड आणि गीता पवार यांच्यानंतर शामराव गेडाम (लोणी) यांना ताबा देण्यासाठी अधिकारी बाबूलाल राठोड यांच्या शेतात पोहोचले. त्यावेळी बाबूलाल यांनी मी १९९१ पूर्वीपासून कसत असलेली दोन हेक्टर शेतजमीन देणार नाही, अशी भूमिका घेतली. ही जमीन मधुकर येरावार यांच्याकडून घेतल्याचे ते सांगत होते. मात्र अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढत कारवाई सुरू केली.
च्कसत असलेली जमीन हातातून जात असल्याचे पाहून बाबूलाल शेतातील झाडाकडे धावत सुटले. तेथील औषधाच्या बाटलीतील विष प्राशन केले.
च्अचानक घडलेल्या या प्रकाराने पोलिसही चक्रावले. त्यानंतर जमीन ताब्यात घेण्याची कारवाई थांबवण्यात आली. पोलिसांनी बाबूलाल यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले.