लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : एका महिलेची आॅटो रिक्षामध्ये विसरलेली पर्स रिक्षाचालकाने प्रामाणिकपणे परत केली. या पर्समध्ये तब्बल १० तोळे सोने आणि दोन हजार रुपयांची रोकड होती. स्वारगेट पोलिसांनी शकील अल्ताफ मुल्ला (रा. कोंढवा) या प्रामाणिक रिक्षाचालकाचा सत्कार केला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नयना जनार्दन बांदल (वय २८, रा. केपी नगर, हरिविठ्ठल अपार्टमेंट, धनकवडी) या त्यांची आई व दोन लहान मुलींसोबत बाजीराव रस्त्यावर कामानिमित्त गेल्या होत्या. स्वारगेटला यायचे असल्याने त्यांनी आॅटोरिक्षाला हात केला. मुल्ला यांच्या रिक्षात बसून स्वारगेटकडे येत असताना त्यांनी जवळची पर्स सीटच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेमध्ये ठेवली. स्वारगेट एसटी स्थानकाजवळ सर्व जण खाली उतरल्यानंतर भाड्याचे पैसे घेऊन मुल्ला पुढे निघून गेले. काही वेळाने आपली पर्स रिक्षामध्ये विसरल्याचे बांदल यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने नेहरू स्टेडीयम पोलीस चौकीमध्ये जाऊन आपली पर्स रिक्षामध्ये विसरल्याचे सांगितले. पोलीस उपनिरेक्षक बी. एस. गुरव, कर्मचारी नाईक, व्ही. पी. माने यांनी प्राथमिक चौकशी केल्यावर पर्समध्ये बांदल यांचा मोबाईल असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी या मोबाईलवर फोन लावला असता मुल्लांनी पोलिसांना आपण पोलीस चौकीमध्ये येत असल्याचे कळविले. दरम्यान, मुल्ला यांच्याही बांदल पर्स विसरल्याचे लक्षात आल्यावर पुन्हा रिक्षा वळवून पोलीस चौकीच्या दिशेने जात असतानाच पोलिसांचा फोन आला. पोलीस चौकीत जाऊन मुल्ला यांनी पर्स त्यांच्या स्वाधीन केली. पर्समधील सर्व साहित्य आणि रक्कम जशीच्या तशी होती. मुल्ला यांच्या प्रामाणिकपणाबद्दल वरिष्ठ निरीक्षक फारूख काझी, निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र पंडित यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
रिक्षाचालकाच्या नेकीमुळे भारावले कुटुंब
By admin | Updated: June 10, 2017 02:19 IST