प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 11:33 IST2025-11-09T11:33:02+5:302025-11-09T11:33:22+5:30
Lote MIDC News: इटलीमध्ये तब्बल साडेतीन लाख लोक राहणाऱ्या भागातील जलस्रोत बाधित केल्यामुळे बंद करण्यात आलेल्या मिटेनी कंपनीची उपकरणे आणि कायमचे रसायन (फॉरएव्हर केमिकल) बनवण्याची प्रक्रिया आता लोटेतील लक्ष्मी ऑरगॅनिक या कंपनीकडे आहे.

प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
रत्नागिरी - इटलीमध्ये तब्बल साडेतीन लाख लोक राहणाऱ्या भागातील जलस्रोत बाधित केल्यामुळे बंद करण्यात आलेल्या मिटेनी कंपनीची उपकरणे आणि कायमचे रसायन (फॉरएव्हर केमिकल) बनवण्याची प्रक्रिया आता लोटेतील लक्ष्मी ऑरगॅनिक या कंपनीकडे आहे. पर्यावरणीयदृष्ट्या आणि त्यामुळे मानवी आरोग्यासाठी ही रसायने घातक असल्याने प्रदूषणाचे मोठे संकट भविष्यात लोटे आणि परिसरावर येण्याची भीती पर्यावरण तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र, भारतीय पर्यावरण यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत आहेत.
प्रदूषण निर्माण केल्यामुळे २०१८ मध्ये कंपनी बंद
मिटेनी कंपनी इटलीतील विसेन्झा शहरात होती. भयंकर प्रदूषण निर्माण केल्यामुळे २०१८ मध्ये कंपनी बंद झाली. विसेन्झीच्या न्यायालयाने पर्यावरण प्रदूषण आणि इतर कारणांसाठी या कंपनीच्या संचालकांना आणि अधिकाऱ्यांना जेलमध्ये पाठवले.
या कंपनीची सर्व उपकरणे आणि त्यातील प्रक्रिया भारतातील लक्ष्मी ऑरगॅनिक या कंपनीची उपकंपनी असलेल्या व्हिवा लाइफ सायन्सेसने खरेदी केली आहे. लोटे येथे लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीने नुकतेच कायमचे रसायन बनवण्याचे उत्पादन सुरू केले आहे.
सांडपाण्यात रसायन, जलस्रोत मोठ्या प्रमाणात दूषित
इटलीतील मिटेनी कंपनीच्या सांडपाण्यामध्ये कायमचे रसायन (पीएफएएस) मोठ्या प्रमाणात आढळले. या रसायनमिश्रित सांडपाण्यामुळे जलस्रोत मोठ्या प्रमाणात दूषित झाले. हे पाणी पिणाऱ्या लोकांच्या रक्तात कायमचे रसायन मिसळले आणि त्यामुळे त्यांना आरोग्यविषयक अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. यात मिटेनीच्या कामगारांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला.
ही रसायने सहजपणे विघटित होत नाहीत
पीएफएएस म्हणजे प्रति आणि पॉलिफ्लोरोआल्काइल पदार्थांचा मानवनिर्मित रसायनांचा मोठा गट. १९४० पासून विविध उत्पादने आणि औद्योगिक क्षेत्रात त्याचा वापर सुरू झाला. त्याला कायमचे रसायन असे म्हणतात. ही रसायने सहजपणे विघटित होत नाहीत. त्यामुळेच ते आरोग्यासाठी हानिकारक आहे.
आरोग्यावरील परिणाम
कायमचे रसायन हवेत आणि मानवी शरीरात दीर्घकाळ टिकून राहात असल्याने मूत्रपिंड व वृषण कर्करोगाचा धोका वाढतो. हार्मोनल समतोल बिघडून थायरॉईड, प्रजनन समस्या आणि मुलांची वाढ यावर परिणाम होऊ शकतो. यकृताच्या कार्यपद्धतीवर परिणाम होतो. कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब वाढण्याचा धोका वाढतो. रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो.
धोका आता उशाशी
इटलीमधील उदाहरण समोर असतानाही जल आणि अन्य प्रदूषणांचा धोका असलेली ही रसायने बनवण्याचा कारखाना सध्या लोटे येथे सुरू असून, भविष्यात तो परिसरासाठी धोकादायक ठरू शकतो. भारतीय पर्यावरण विभागाकडून अशा उत्पादनांबाबत गांभीर्य दाखवले जात नसल्याची टीका पर्यावरण तज्ज्ञांकडून वारंवार केली जाते. त्यानंतरही अशा उत्पादनाला परवानगी दिली जाते.