विदेशी पाहुण्यांनी दिली थंडीची ‘वर्दी’; कोकणात सीगल पक्ष्यांचे आगमन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 14:33 IST2025-11-03T14:30:58+5:302025-11-03T14:33:00+5:30
सायबेरिया, रशिया आणि उत्तरेकडील बर्फाच्छादित प्रदेशातून तब्बल पाच ते सहा हजार किलोमीटरचा प्रवास करीत हे पक्षी दरवर्षी भारतात दाखल होतात

विदेशी पाहुण्यांनी दिली थंडीची ‘वर्दी’; कोकणात सीगल पक्ष्यांचे आगमन
शिवाजी गोरे
दापोली : परतीच्या पावसाच्या वाढलेल्या मुक्कामामुळे साऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. मात्र, थंडीची चाहूल देणारे विदेशी सीगल पक्षी दापोलीच्या किनाऱ्यावर दिसू लागले आहेत. त्यामुळे दापोलीकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
सायबेरिया, रशिया आणि उत्तरेकडील बर्फाच्छादित प्रदेशातून तब्बल पाच ते सहा हजार किलोमीटरचा प्रवास करीत हे पक्षी दरवर्षी भारतात दाखल होतात. दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या सुमारास ते कोकण किनाऱ्याकडे झेप घेतात आणि थंडीच्या हंगामात स्थिरावतात.
रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णै बंदर, दापोली, गणपतीपुळे, आरे-वारे यांसारख्या किनाऱ्यांवर सध्या या पक्ष्यांचे थवे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. समुद्रावर उडणाऱ्या या पांढऱ्या पंखांच्या झुंडी, वाऱ्याशी खेळणारी त्यांची उडाण आणि त्यांच्या किलबिलाटाने साऱ्या किनारपट्टीवर थंडीची चाहूल निर्माण झाली आहे.
सिगल्सच्या आगमनामुळे कोकणात दाखल झालेल्या पर्यटकांनाही कुतूहल वाटू लागले आहे. समुद्रावर दिसणाऱ्या या पक्ष्यांना आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी पर्यटकांसह पक्षिप्रेमींची लगबग सुरू हाेते.
काेकणच्या समुद्रकिनाऱ्याचे आकर्षण
या पक्ष्यांच्या आगमनामागे कोकणातील उबदार हवामान आणि समृद्ध सागरी अन्नसाठा हे मुख्य कारण आहे. किनाऱ्यावर सहज मिळणारे छोटे मासे, कोळंबी आणि सागरी कीटकांवर हे पक्षी उपजीविका करतात. कोकणाचा स्वच्छ समुद्र आणि शांत वातावरण या पक्ष्यांना आकर्षित करते. फेब्रुवारीच्या अखेरीस, पावसाळ्याची चाहूल लागताच हे पाहुणे पुन्हा आपल्या मायदेशी परततात.