Exclusive: राजभवनातल्या गंजलेल्या तोफांतून कुणी हल्ले करणार असतील, तर...; संजय राऊत यांनी सोडला बाण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 06:24 PM2020-05-26T18:24:05+5:302020-05-26T18:24:51+5:30

''या सरकारला पाच वर्षं कोणत्याही प्रकारचा धोका नाही आणि जे असा धोका निर्माण करायचा प्रयत्न करतील ते खड्ड्यात जातील'' - संजय राऊत

Exclusive Interview: Shiv Sena Leader Sanjay Raut on Political Developments in Maharashtra ajg | Exclusive: राजभवनातल्या गंजलेल्या तोफांतून कुणी हल्ले करणार असतील, तर...; संजय राऊत यांनी सोडला बाण

Exclusive: राजभवनातल्या गंजलेल्या तोफांतून कुणी हल्ले करणार असतील, तर...; संजय राऊत यांनी सोडला बाण

Next

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या जशी वाढतेय, तसंच इथलं राजकीय वातावरणही तापू लागलंय. कोरोना संकट हाताळण्यात सरकार सपशेल अपयशी ठरल्याची विरोधी पक्षांनी राज्यपालांकडे केलेली तक्रार, त्यानंतरचं ‘माझं अंगण – रणांगण’ हे आंदोलन, राज्यपालांनी बोलावलेली बैठक, त्यात मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती, मग अचानक शिवसेना नेते  संजय राऊत, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पाठोपाठ भाजपा खासदार नारायण राणे यांनी गाठलेलं राजभवन, शरद पवारांनी ‘मातोश्री’वर जाऊन  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी केलेली दीर्घ चर्चा, या गोष्टींमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. राष्ट्रपती राजवट लागू होण्याची वर्तवली जातेय. मात्र, या सगळ्या चर्चा खोडून काढत, राजभवनातील भुयारात सापडलेल्या गंजलेल्या तोफांमधून कुणी हल्ले करणार असतील तर आमचाही तोफखाना तयार आहे, आम्ही हाडाचे शिवसैनिक आहोत, असा इशारा शिवसेना  नेते खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीबद्दल शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याचं वृत्त धादांत खोटं आहे. तीन वेगळे पक्ष एकत्र आहेत, त्यामुळे कदाचित भूमिका वेगळ्या असू शकतात, पण निर्णयप्रक्रिया एकाच माणसाच्या – उद्धव ठाकरेंच्याच हाती आहे. अफवांचा धुरळा खाली बसल्यानंतर, काय बोलणं झालं ते सगळ्यांना सांगू. पण, या सरकारला पाच वर्षं कोणत्याही प्रकारचा धोका नाही आणि जे असा धोका निर्माण करायचा प्रयत्न करतील ते खड्ड्यात जातील, असंही संजय राऊत यांनी ठामपणे सांगितलं. लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी राऊत यांची सविस्तर मुलाखत घेतली, त्यावेळी विरोधी पक्षांना खडे बोल सुनावत त्यांनी  सरकारच्या बाजूने जोरदार ‘बॅटिंग’ केली.

  

राज्यपालपदी जी व्यक्ती बसते, ती काही ना काही काम शोधत असते. राजभवनही सक्रिय आहे, हे दाखवायचा प्रयत्न करत असते. आत्ताचे आपले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे तर एका राज्याचे मुख्यमंत्री राहिलेत. ते आमदार-खासदारही होते. संघाचे प्रचारक राहिलेत. ते चळवळीतले असतात. विविध मार्गाने काम करत असतात. पण, त्याचा परिणाम महाराष्ट्रातील सरकारवर होईल आणि राज्यात अस्थिरता निर्माण होईल, हे जे वातावरण निर्माण केलं जातंय ते साफ चुकीचं आहे, असं मत संजय राऊत यांनी मांडलं. विरोधी पक्षासाठी राजभवन हे सतत तक्रारी करण्याची, मन मोकळं करण्याची जागा असते. त्यात त्यांचा वेळ जातो. त्यामुळे तो आनंद त्यांच्यापासून हिरावून घेऊ नये, असा चिमटाही त्यांनी काढला.  सरकारला कामाला लावण्यासाठी विरोधी पक्षाची गरज नाही. संकट प्रसंगी मंत्रिमंडळ, प्रशासनाला सोबत घेऊन मुख्यमंत्री काम करत असतात. राज्यपाल पालक म्हणून किंवा घटनात्मक प्रमुख म्हणून आवश्यक ती माहिती मागवू शकतात किंवा सूचनाही करू शकतात. मात्र, ते समांतर सरकार चालवू शकत नाहीत आणि सध्या तसं चाललंय असं वाटत नाही, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.

संजय राऊत ‘राजभवन’ला कशासाठी गेले?

राजभवन हा राजकारणाचा अड्डा होता कामा नये, अशा शब्दांत संजय राऊत यांनी थेट राज्यपालांवर निशाणा साधला होता. उद्धव ठाकरेंच्या आमदारकीवरून घडलेल्या घडामोडींच्या वेळी शिवसेना विरुद्ध राजभवन असंच चित्र निर्माण झालं होतं. मात्र, परवा  अचानक संजय राऊत राजभवनला गेले आणि राज्यपालांना त्यांनी अक्षरशः वाकून  नमस्कार केला. या भेटीची बरीच चर्चा झाली. त्याबद्दल विचारलं असता, राऊत यांनी मुद्द्याचं बोलणं टाळलं.  

राजभवन या वास्तूमध्ये जाण्यात एक आनंद आहे. ते बोलावतात, आपण जातो. तिथे इतकं निसर्गरम्य वातावरण आहे की मुंबईत कोरोनाच्या संकटात आहोत, असं वाटत नाही. उत्तम पाहुणचार होतो. मोर नाचताना दिसतात, हरणं दिसतात. अशा ठिकाणी बोलावलं तर आनंदाने जावं, असं ते म्हणाले. ज्यांना  बोलावत नाहीत, तेही वेळ घेऊन जातात. विरोधी पक्ष वारंवार जातो. तो कोणतं दुःख विसरण्यासाठी जातो हे पाहावं लागेल, असा टोमणाही त्यांनी मारला.

राजभवनात वर खूप मोकळी हवा आहे. पण मधल्या काळात तिथे एक भुयार सापडलं होतं. त्यात गंजलेल्या तोफा होत्या. या गंजलेल्या तोफांमधून कुणी हल्ले करणार असतील तर आमचाही तोफखाना तयार आहे. आम्ही हाडाचे शिवसैनिक आहोत, प्राण जाए पर वचन न जाए, असा सूचक इशारा राऊत यांनी विरोधकांना दिला.

राज्यपाल आणि मी संसदेत एकत्र काम केलं आहे. राज्यसभेत आम्ही शेजारी बसायचो. त्यामुळे राजकारण, सरकारचं काम आणि इतर गमतीजमतींवर गप्पा होतात. दिलदारी दाखवणाऱ्या नेत्यांपैकी  राज्यपाल एक आहेत, असं कौतुकही संजय राऊत यांनी केलं. मी नेहमीच वडीलधाऱ्या व्यक्तींना वाकून नमस्कार करतो, तो बाळासाहेबांनी  दिलेला संस्कार आहे, अशी त्या खास नमस्कारामागची गोष्टही त्यांनी सांगितली.

...अन् शरद पवार 'मातोश्री'वर गेले!

राजभवनला जाऊन आल्यानंतर शरद पवार ‘मातोश्री’वर गेल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  मात्र, या भेटीमुळे सरकारच्या स्थिरतेबाबत शंका बाळगण्याची गरज नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला. मातोश्रीवर जाण्याआधी जवळपास तासभर मी सिल्वर ओकवर होतो. आमची बराच वेळ चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी फोनवर बोलणंही झालं. खरं तर तेच सिल्वर ओकवर यायला तयार होते, पण खूप दिवस बाहेर पडलो नाही, म्हणून मातोश्रीवर स्वतःच जायचं ठरलं, असं संजय राऊत यांनी सांगितलं. मातोश्रीवरच्या बैठकीत काय चर्चा झाली ती  अफवांचा धुरळा  खाली  आला की सांगू. पण शरद पवार हे उद्धव ठाकरेंच्या कामावर नाराज असल्याची चर्चा खोटी आहे, असं राऊत यांनी ठामपणे सांगितलं.    

Web Title: Exclusive Interview: Shiv Sena Leader Sanjay Raut on Political Developments in Maharashtra ajg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.