१८ वर्षांवरील सर्वांना मिळणार लस; मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांनी मानले केंद्राचे आभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 20:36 IST2021-04-19T20:34:00+5:302021-04-19T20:36:01+5:30
Coronavirus Vaccination : १ मेपासून देशात होणार लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात. १८ वर्षांवरील सर्वांना मिळणार कोरोना प्रतिबंधात्मक लस.

१८ वर्षांवरील सर्वांना मिळणार लस; मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांनी मानले केंद्राचे आभार
देशात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी नोंद होताना दिसतेय. या पार्श्वभूमीवर देशात १८ वर्षावरील सर्वांना लसीकरण करण्यात यावं अशी मागणी करण्यात येत होती. दरम्यान, आता १ मे पासून देशातील १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी केंद्र सरकारनं १ मेपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बड्या फार्मा कंपन्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता. दरम्यान, केंद्राच्या या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.
"काही दिवसांपूर्वीच मी देशातील २५ वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची गरज असून तसा निर्णय घेण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती. केंद्र शासनाने त्यावर सकारात्मक पाऊल उचलून १८ वर्षे वयापुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय जाहीर करून आपल्या मागणीचा विचार केला त्यासाठी पंतप्रधान आणि आरोग्यमंत्री यांचे मी मनापासून आभार मानतो," असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यात या अनुषंगाने पुरेपूर नियोजन केले जाईल आणि लसीचा यासाठी पुरवठा वेळच्यावेळी मिळत राहिल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
याशिवाय पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीदेखील केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. "केंद्र सरकारनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या मागणीची दखल घेतल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे मी आभार मानतो. लसीकरणासाठी वयाची मर्यादा कमी केल्यामुळे आता कोरोनाची तिसरी लाट आल्यास त्याचा सामना करण्यासाठी मदत होईल," असं आदित्य ठाकरे म्हणाले.
I’m glad and grateful that the GoI has accepted what @CMOMaharashtra Uddhav Thackeray ji and many other CMs, MPs and States had requested the GoI to consider- lowering the age and covering the younger population in the vaccination drive. (1/n)
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 19, 2021
१ मे पासून व्यापक लसीकरण
१ मे पासून देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात होणार आहे. दरम्यान, तिसऱ्या टप्प्यात १८ वर्षांवरील सर्वांनाच कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. सध्या देशात लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. यामध्ये ४५ वर्षांवरील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येत आहे. देशात लसींचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहितही केलं जाणार आहे. तसंच लस उत्पादन करणाऱ्या कंपन्या आपल्या एकूण क्षमतेच्या ५० टक्क्यांपर्यंक पहिल्यांदा घोषित केलेल्या किंमतींवर राज्य सरकारांना आणि खुल्या बाजारातही विक्री करु शकणार आहेत.