Everyone in Maharashtra must learn Marathi - | महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकणे आवश्यक - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकणे आवश्यक - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

नवी मुंबई : मराठी आणि उत्तराखंडातील पहाडी भाषा या दोन भाषांमध्ये बरेचसे साधर्म्य आहे. मराठी बोलणे फारसे अवघड नाही, त्यामुळे महाराष्ट्रात राहणाºया प्रत्येकाने मराठी भाषा आत्मसात करून घ्या, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले आहे.

वाशी रेल्वे स्थानकाजवळ उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक स्वरूपाच्या उत्तराखंड भवनचे लोकार्पण बुधवारी राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत, उत्तराखंड राज्याच्या आदिवासीमंत्री रेखा त्यागी, महापौर जयवंत सुतार, आमदार गणेश नाईक, मंदा म्हात्रे आदी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील देश प्रगती करत आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून गाव तेथे रस्ता झाला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करीत आहेत. आज रस्त्यांचे संपूर्ण देशात जाळे तयार झाले असून, सगळी राज्ये एकमेकांशी जोडली गेली आहेत, असे राज्यपाल कोश्यारी यांनी या वेळी स्पष्ट केले. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. येथे वास्तव्य करताना आपल्या मूळ राज्याला, प्रांताला विसरू नका. आपल्या गावाचा विकास करण्यासाठी आपल्या मूळ गावांना अवश्य भेटी द्या, असे आवाहनही कोश्यारी यांनी या वेळी केले.
महापौर जयवंत सुतार, आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे यांची या वेळी भाषणे झाली. कार्यक्रमास उत्तराखंड राज्याचे मूळ रहिवासी असलेले; परंतु मुंबईमध्ये कार्यरत असलेले अधिकारी, चित्रपट कलावंत यांसह नागरिक उपस्थित होते.

‘अ‍ॅडव्हेंचर टुरिझम विकसित करणार’
उत्तराखंड राज्यात अ‍ॅडव्हेंचर टुरिझम विकसित करणार असून, १२०० कोटी रुपये खर्च करून टेहरी पर्यटनस्थळ विकसित करण्यात येत असल्याचे उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी या वेळी सांगितले. उत्तराखंड भवन राज्यासाठी सन्मानाचे प्रतीक असून पर्यटन, उत्पादन, गुंतवणूकदारांसाठी या भवनात कार्यालय बनवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Everyone in Maharashtra must learn Marathi -

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.