‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 16:58 IST2025-10-02T16:58:41+5:302025-10-02T16:58:50+5:30
Harshwardhan Sapkal Criticize RSS: संघाने संविधान आणि गांधी विचार स्वीकारावा आणि संघाचे विसर्जन करावे हे आवाहन आम्ही केले होते. पण आज दसऱ्याच्या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यावर एक शब्दही काढला नाही. संघाला १०० वर्षे झाली तरी ‘मुंह में राम बगल में छुरी’, ही संघाची भूमिका आजही बदललेली नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची १०० वर्ष, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती, दसरा व धम्मचक्र परिवर्तन दिन असा सुवर्ण योग आला हा नियतीचा संकेत आहे, तो संकेत मानून संविधान व गांधी विचार स्वीकारावा आणि संघाचे विसर्जन करावे हे आवाहन आम्ही केले होते. पण आज दसऱ्याच्या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यावर एक शब्दही काढला नाही. संघाला १०० वर्षे झाली तरी ‘मुंह में राम बगल में छुरी’, ही संघाची भूमिका आजही बदललेली नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत दीक्षाभूमीपासून सुरु झालेल्या संविधान सत्याग्रह पदयात्रेची सेवाग्राम येथे यशस्वी सांगता झाली. यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम समाजात भ्रम पसरवण्याचे आहे. देशाची फाळणी महात्मा गांधी यांच्यामुळे झाली व पाकिस्तानला ५५ कोटी रुपये दिले, असा अपप्रचार संघ व संघ परिवार करत आला आहे. तसेच महान क्रांतीकारक भगतसिंह यांना फाशी झाली त्यावेळी गांधीजी गप्प बसले होते हा एक अपप्रचार केला जातो परंतु ३० जानेवारी १९४८ रोजी गांधीजींची हत्या करण्याआधी त्यांना मारण्याचा सहावेळा प्रयत्न केला, त्यावेळी पाकिस्तान व ५५ कोटींचा प्रश्न कोठे होता? भगतसिंहाना फाशी होऊ नये म्हणून गांधींजींनी अनेक प्रयत्न केले होते हे भगतसिंह यांचे भाचे प्रो. जगमोहन यांनीच सांगितले आहे.
संघाला १०० वर्ष होत असताना परवाच संघाने नागपूरच्या व्हरायटी चौकात महात्मा गांधी यांना अभिवादन केले, ज्यांचा सर्वात जास्त वेळ महात्मा गांधी यांना बदनाम करण्यात गेला त्यांना गांधीजींनाच शरण जावे लागले हा संघाचा वैचारिक पराभव आहे, त्यांनी आता संविधान स्विकारावे व संविधानाला अभिप्रेत देश निर्माण करण्यासाठी काम करावे. तसेच गांधी विचार स्विकारावा हे आमचे आवाहन होते पण आज युवक काँग्रेसचे पदाधिकारी संविधानाची प्रत घेऊन संघाचे मुख्यालय रेशीम बागेकडे जात असताना त्यांना अटक करण्यात आली. आज अटक करण्यात आली असली तरी पुन्हा एनएसयुआयच्या हाती संविधान देऊन पाठवू आणि नाही घेतले तर ३० जानेवारीला गांधी पुण्यतिथीदिनी महिला पदाधिकारी जातील आणि तेव्हाही घेतले नाही तर १४ एप्रिलला पुन्हा त्यांना संविधान देण्याचा प्रयत्न करू. आरएसएस विसर्जित करा ही मागणी घेऊन वर्षभर पदयात्रा काढू, असा निर्धार काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी बोलून दाखवला.