"गृहमंत्री असल्यामुळे काय असतं की, प्रत्येक गोष्टीचा संबंध थेट माझ्याशी जोडला जातो. प्रत्येक गोष्टीला थेट जबाबदार मीच. तुमच्या एक लक्षात आलं पाहिजे की, २०२२-२४... जळी, स्थळी, काष्टी पाषाणी तुम्ही मलाच टार्गेट केलं. प्रत्येक गोष्ट माझ्याशी जोडली आणि परिणाम काय झाला? परिणाम असा झाला की लोकांनी आधीपेक्षा जास्त बहुमत आम्हाला दिलं. त्यावरून तुम्ही काही शिकतंच नाही", असे म्हणत मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी वारंवार घेरले जात असल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांना उत्तर दिले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस म्हणाले, "कुठली घटना झाली आणि कोणीही घटना केली की, काही लोक थेट माझा सगासोयराच करून टाकतात त्याला. ही फॅशन झालेली आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, आपण झालेली प्रत्येक घटना बघा. गृह विभागाने अतिशय कडक कारवाई केलेली आहे", असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, "पुन्हा एकदा सभागृहाला सांगतो की, माझा सगासोयरा जरी अपराधी असेल, तरी त्याला शिक्षा करायला मी मागेपुढे पाहणार नाही. याचं कारण माझा सगा भारताचे संविधान आहे आणि माझे सोयरे ही या महाराष्ट्रातील १३ कोटी जनता आहे. यापलीकडे दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला झुकते माप मिळणार नाही. हा तराजू न्यायदानाचाच याठिकाणी असेल", अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.
"जो समाजाचा शत्रू असेल, तो सुटणार नाही. कोणावर अन्याय झाला, तर तो अन्याय दूर करण्याचा प्रयत्न आपण करू. अलिकडच्या काळात नाना पटोले रोज एक वाक्य वापरतात. कुंपणच शेत खातंय. हे कुठले कुंपण आहे नानाभाऊ? आमच्या शेताला कुंपणच नाहीये. हे खुले शेत आहे. कोणीही आमच्या शेतात येऊ शकते. काही अडचण नाहीये", असे मिश्कील विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले.