Ramdas Kadam Devendra Fadnavis: राज्यात सध्या महायुतीचे सरकार आहे. २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला न भूतो असे यश मिळाले. त्यातही भाजपा पक्ष क्रमांक एकचा पक्ष ठरला. परंतु, यानंतर शपथविधीपासून ते मंत्रिमंडळ विस्तारापर्यंत अनेक टप्प्यांवर महायुतीत मानापमान नाट्य घडल्याचे पाहायला मिळाले. पालकमंत्रीपदावरून महायुतीत असलेली धुसपूस अद्यापही शमलेली नाही. यातच महायुतीतील घटक पक्ष एकमेकांवर कुरघोडी करायची एकही संधी सोडत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे सांगितले जाते. यातच आता भाजपा नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे भाकित केले. त्यावर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली.
२०८० पर्यंत फडणवीस मुख्यमंत्री...
"२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिले तरीही आमची काही अडचण नाही. आमच्या देवेंद्रजींनाही शुभेच्छा आहेत, बावनकुळेंनाही शुभेच्छा आहेत. एकनाथ शिंदेंनाही शुभेच्छा आहेत. आम्ही सगळे एक आहोत. कुणीही आग लावायचा प्रयत्न केला तरीही आमच्यात मतभेद होणार नाहीत," अशी प्रतिक्रिया देत रामदास कदम यांनी विरोधकांना टोला लगावला.
बावनकुळे काय म्हणाले होते?
एका सभेत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस २०३४ पर्यंत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील. विकसित महाराष्ट्राचा संकल्प आपल्याला पूर्ण करायचा आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर असल्याशिवाय विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण होऊ शकत नाही. आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच आपल्याला पुढे जायचे आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डबल इंजिनचे सरकारच महाराष्ट्राचे भले करू शकते.
दरम्यान, पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भाजपा नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन जम्मू काश्मीरला रवाना झाले. त्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू काश्मीरला गेले. यावरून महायुतीत श्रेयवाद सुरू झाल्याची टीका होऊ लागली. यावरही बावनकुळे यांनी उत्तर दिले. पर्यटकांना सुखरूप आणण्याच्या प्रयत्नाला कोणी श्रेयवाद म्हणत असेल तर दुर्दैवाची बाब आहे. यात राजकारण करणे योग्य नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.