Uddhav Thackeray Interview : "वचन पूर्ण केल्यानंतरसुद्धा मी काय दुकान बंद करून बसेन?," पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 09:00 IST2022-07-27T09:00:01+5:302022-07-27T09:00:01+5:30
मी पक्षप्रमुख आहे. मुख्यमंत्री होणार असे मी बोललो नव्हतो, उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य

Uddhav Thackeray Interview : "वचन पूर्ण केल्यानंतरसुद्धा मी काय दुकान बंद करून बसेन?," पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे
काही दिवसांपूर्वी राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. त्यानंतर शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांना साथ दिली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, आपण शिवसेनेतून बाहेर पडलो नसून शिवसेना ही आपलीच असा दावा एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. यावरून आता उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
“जर शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा नसेल तर माझ्या लढाईला काय अर्थ आहे,” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांवर आपलं मत व्यक्त केलं. “माझं जे शिवसेनाप्रमुखांना वचन आहे ते आजही कायम आहे. मी तर शिवसेनेचाच आहे. मी पक्षप्रमुख आहे. पण माझा हेतू तो नव्हता. मी मुख्यमंत्री होणार असे मी बोललो नव्हतो आणि वचन पूर्ण केल्यानंतरसुद्धा मी काय दुकान बंद करून बसेन? शिवसेना मला वाढवायची आहे आणि ती जर का वाढवण्याचा प्रयत्न मी सोडणार असेन तर मी कशाला पक्षप्रमुख?,” असा सवाल त्यांनी केला. शिवसेनेचं तुफान आहेच. लोकांच्या मनात, हृदयात आजही तुफान आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचं तुफान पुन्हा येईल, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
'उद्या मोदीशी तुलना करतील'
स्वतःला मुख्यमंत्री पद त्यांनी अत्यंत वाईट पद्धतीने मिळवले. आता तर शिवसेनाप्रमुखांबरोबर तुलना करायला लागले की, ‘ही आमची शिवसेना’ म्हणून. अत्यंत घाणेरडा, दळभद्री प्रकार आहे. हे बघितल्यानंतर भाजप त्यांना कधी पुढे करेल असे वाटत नाही. नाही तर नंतर ते नरेंद्र मोदींशी स्वतःची तुलना करतील आणि पंतप्रधान पद मागतील. शेवटी लालसा, अशी घाणेरडी असते, ही चटक आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला.