मुस्लीम, शेतकऱ्यांसाठीही मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करा; मनोज जरांगेंच्या मुख्यमंत्र्यांकडे नवीन मागण्या काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 13:37 IST2025-09-05T13:13:11+5:302025-09-05T13:37:25+5:30

Manoj Jarange Devendra Fadnavis: मुख्यमंत्री सरसकट म्हणत नसले, तरी संपूर्ण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा आरक्षणात जाणार असा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे. 

Establish a subcommittee of ministry for Muslims and farmers; What are Manoj Jarange's new demands from the Chief Minister? | मुस्लीम, शेतकऱ्यांसाठीही मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करा; मनोज जरांगेंच्या मुख्यमंत्र्यांकडे नवीन मागण्या काय?

मुस्लीम, शेतकऱ्यांसाठीही मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करा; मनोज जरांगेंच्या मुख्यमंत्र्यांकडे नवीन मागण्या काय?

मुख्यमंत्री सर्व मराठा समाजाला सरसकट आरक्षण नाही, असं म्हणत असले, तरी संपूर्ण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र कुणबी म्हणून आरक्षणामध्ये जाणार असा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी हैदराबाद गॅझेटमुळे सर्वांना आरक्षण मिळेल, अशी भूमिका मांडली. त्याचबरोबर मुस्लीम, आदिवासींसह इतर काही घटकांसाठी मंत्रिमंडळ उपसमित्या स्थापन करण्याची मागणी केली आहे. 
  
हैदराबाद गॅझेटबद्दल उपस्थित केल्या जात असलेल्या शंकाबद्दल मनोज जरांगेंनी पुन्हा विचारण्यात आले. ते म्हणाले, "सगळं व्यवस्थित आहे. जीआर व्यवस्थित आहेत. मराठवाड्यातील सगळा मराठा समाज व्यवस्थित कुणबीच्या माध्यमातून आरक्षणामध्ये जाणार आहे. सातारा संस्थानच्या माध्यमातून संपूर्ण मराठा समाज आरक्षणात जाणार आहे. काही संभ्रम नाही."

सगळे आरक्षणात जाणार

"आम्ही सुधारित जीआर काढायला सांगितलं आहे. मला माहिती आहे आणि माझ्या गरिबांना माहिती आहे की, आम्ही कसं करतोय, कसं घेतोय. मुख्यमंत्री सरसकट म्हणत असेल, तरी मराठवाडा सगळा आरक्षणात जाणार. पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जाणार, त्याचा अर्थ माझ्या गरिबाला समजतोय. बाकीच्यांना काय म्हणायचं ते म्हणू द्या", असा दावाही मनोज जरांगे यांनी केला.  

हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाज एसटी असल्याचे आढळून आले आहे. त्यांची अशी मागणी आहे की, बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळालं पाहिजे. बंजारा समाजासाठीही हैदराबाद गॅझेट लागू करावं, अशी त्यांची मागणी आहे. याबद्दल मनोज जरांगे यांना विचारण्यात आले.

कोणत्या घटकांसाठी उपसमितीची मागणी?

मनोज जरांगे पाटील म्हणाले, "असेल, तर द्या ना म्हणा. प्रत्येक वेळी गरिबाला का वेठीस धरायचं. त्याचबरोबर तो प्रश्न तरी कशाला मागे ठेवायचा. मुख्यमंत्री साहेब, दलित-मुस्लिमांना एक उपसमिती करा. शेतकऱ्यांसाठी एक उपसमिती पाहिजे. शेतकऱ्यांचेही प्रश्न सुटले पाहिजेत."

"आदिवासी समाजासाठीही एक मंत्रिमंडळाची उपसमिती असायला पाहिजे. का नसायला पाहिजे? मायक्रो ओबीसींसाठीही एक समिती असायला पाहिजे. त्या गरिबांचेही प्रश्न सुटतील ना. तुमच्या म्हणण्याप्रमाणेच कायदा चालवत आहात का तुम्ही आणि सरकारही?", असा सवाल जरांगेंनी उपस्थित केला.

Web Title: Establish a subcommittee of ministry for Muslims and farmers; What are Manoj Jarange's new demands from the Chief Minister?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.