'पलायन व प्रश्नांचा ढेकूण झटकणे हा मार्ग नाही'; ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेसला सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 09:54 IST2025-02-20T09:52:26+5:302025-02-20T09:54:58+5:30
काँग्रेसचे विदेश विभागाचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी केलेल्या एका विधानावरून भाजपने काँग्रेस पक्षाला घेरले. त्यानंतर काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेने टीका केली.

'पलायन व प्रश्नांचा ढेकूण झटकणे हा मार्ग नाही'; ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेसला सुनावले
"सॅम पित्रोदा यांची अनेक विधाने ही वाद ओढवून घेणारी ठरली व काँग्रेसची त्यामुळे कुचंबणा झाली. आता त्यात चीनवरील विधानाची भर पडली. नेहमीप्रमाणे काँग्रेसने सॅम यांच्या विधानापासून स्वतःला दूर केले", असे म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवरून खडेबोल सुनावले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
"चीनला शत्रू मानणे अयोग्य आहे. चीनपासून भारताला कोणता धोका आहे हेच मला समजत नाही. चीनसंदर्भातील समस्यांना कायम फुगवून सांगितले जाते. भारताने चीनबाबतचा दृष्टिकोन बदलून त्या देशाला शत्रू मानणे बंद केले पाहिजे", असे विधान काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी केले होते. त्यावर बोट ठेवत भाजपने काँग्रेसला घेरले.
भाजपच्या टीकेनंतर काँग्रेस सॅम पित्रोदांच्या विधानापासून दूर केले. काँग्रेसच्या या भूमिकेबद्दल नाराजीचा सूर लावत ठाकरेंच्या शिवसेनेने सुनावले आहे. सामना अग्रलेखातून ठाकरेंच्या शिवसेनेने याबद्दल भाष्य करताना काँग्रेसला डोस दिला आहे.
शिवसेनेने (यूबीटी) काँग्रेसला काय म्हटलं आहे?
ठाकरेंच्या शिवसेनेने चीनसोबतच्या वादावर भाष्य करताना म्हटले आहे की, "चीनने वैर पुकारले आहे, पण मोदी सरकारने कितीही छाती फुगवून दाखवली तरी चीनशी सरळ टक्कर घेण्याची हिंमत त्यांच्यात दिसत नाही. चीनबरोबरचे युद्ध नेहरूंमुळे हरलो व 1962 साली चीनने भारताच्या 37 हजार वर्ग किलोमीटर जमिनीवर कब्जा मिळवला हेच त्यांचे दळण सुरू आहे."
"मोदी हे हिंमतबाज वगैरे पंतप्रधान खरोखरच असतील तर त्यांनी नेहरूंमुळे चीनच्या ताब्यात गेलेली जमीन मुक्त करायला हवी. ते राहिले बाजूला, उलट मोदी काळात चीन लडाखमध्ये घुसला व मोठ्या जमिनीवर कब्जा मिळवला. पंतप्रधान मोदी यांनी हे आक्रमण सहन केले व आता तर त्यांनी गंगेत जाऊन स्नान केल्याने त्यांच्या मनातील वैराग्नी विझून गेला. त्याच गंगास्नानाचे काही थेंब सॅम पित्रोदांच्या अंगावर पडले व त्यांनाही चीन आपला कडवट शत्रू नसल्याचे वाटू लागले", अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेने मोदींवरही केली आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेसला डोस
"या सगळ्यात काँग्रेस पक्ष उगाच घामाघूम झाला व पित्रोदांना दूर ढकलून दिले. खरे तर मोदींना काँग्रेसने विचारायला हवे की, चीन भारताचा शत्रू आहे की नाही त्याबाबतचे परराष्ट्र व्यवहार धोरण लगेच जाहीर करा. म्हणजे आम्ही भूमिका घ्यायला मोकळे. पलायन व प्रश्नांचा ढेकूण झटकणे हा मार्ग नाही", असे ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेसला सुनावले आहे.