चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 07:10 IST2025-10-01T07:06:20+5:302025-10-01T07:10:11+5:30
महाराष्ट्र जागतिक क्षमता केंद्र धोरण मंजूर, नवतंत्रज्ञानाच्या क्षेत्रांतील अग्रस्थान टिकविण्यास साहाय्य

चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
मुंबई : शहरी आणि ग्रामीण भागां सर्वसमावेशक विकास करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि प्रशासकीय गतिमानतेवर भर देणारे 'महाराष्ट्र जागतिक क्षमता केंद्र धोरण २०२५' मंगळवारी झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आले. या धोरणामुळे राज्यात ५० हजार ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक व त्यातून सुमारे चार लाख रोजगार निर्मिती होईल, असे अपेक्षित आहे. या धोरणाचा कालावधी २०२५ ते २०३० असा राहणार आहे.
या धोरणामुळे अवकाश आणि संरक्षण, कृषी आणि अन्न प्रक्रिया, रत्ने व दागिने, लॉजिस्टिक्स, धातू खाणकाम, औषध निर्माण व रसायने, अक्षय आणि हरित ऊर्जा, वस्त्रोद्योग, माहिती तंत्रज्ञान, ऑटोमोटिव्ह अशा प्राधान्य क्षेत्रांना गती मिळणार आहे.
'महाजिओटेक' महामंडळ
राज्याच्या विकासाला आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड जेऊन एकात्मिक आणि नियोजनबद्ध गती देण्यासाठी महाजिओटेक महामंडळ स्थापन करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी १०६ पदांच्या निर्मितीसही मान्यता देण्यात आली.
राज्यात ४०० केंद्रे
सन २०२१ मध्ये देशातील जागतिक क्षमता केंद्रांची संख्या सुमारे १२०० होती. आता ती १९०० पेक्षा जास्त झाली आहे. या केंद्रातून सुमारे १९ लाख लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. राज्यात सध्या ४०० जागतिक क्षमता केंद्रे असून, त्यांमधून सुमारे चार लाख लोकांना रोजगार मिळालेला आहे. या धोरण कालावधीत आणखी ४०० नवीन जागतिक क्षमता केंद्रे स्थापन करणे, ४ लाख रोजगार निर्मिती, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये विस्तार केला जाईल.
कर्करोग उपचारासाठी महाकेअर फाउंडेशनची स्थापना करण्याचा निर्णय
१. राज्यातील कर्करोगग्रस्त रुग्णांना दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी सर्वसमावेशक कर्करोग सेवा धोरण निश्चित करण्यात आले असून, त्यासाठी महाराष्ट्र कॅन्सर केअर-रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशन अर्थात 'महाकेअर फाउंडेशन कंपनी' स्थापन करण्याचा निर्णयदेखील बैठकीत घेण्यात आला आहे.
२. या कंपनीच्या माध्यमातून राज्यभरातील १८ रुग्णालयांतून कर्करोगाशी निगडित विशेषोपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे राज्यात कर्करोगाशी संबंधित डे-केअर केंद्रांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे.
३. या केंद्राच्या माध्यमातून रेडिओथेरपी, केमोथेरपी तसेच पदव्युत्तर आणि अतिविशेषोपचार शिक्षण, सर्व प्रकारच्या कर्करोगांचे निदान, शस्त्रक्रिया, भौतिकोपचार, मानसिक आधार आणि उपचार, संशोधन यांसह पॅलेटिव्ह उपचार, औषध सुविधा यांची उपलब्धता तसेच जनजागृतीचे उपक्रमदेखील राबविले जाणार आहेत.