अजित पवार गटाने मृत व्यक्तींची कागदपत्रे सादर केली; शरद पवार गटाचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 18:42 IST2023-10-06T18:41:36+5:302023-10-06T18:42:00+5:30
Election Commission on NCP : निवडणूक आयोगासमोरील आजची सुनावणी संपली असून, सोमवारी चार वाजता पुन्हा सुनावणी पार पडणार आहे.

अजित पवार गटाने मृत व्यक्तींची कागदपत्रे सादर केली; शरद पवार गटाचा आरोप
Election Commission on NCP : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली. अजित पवारांनी आपल्या समर्थक आमदारांसह बंडखोरी केली अन् पक्षावर दावा केला. याप्रकरणी आज निवडणूक आयोगात पहिल्यांदाच प्रत्यक्ष सुनावणी झाली. या सुनावणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: निवडणूक आयोगाच्या कार्यालयात दाखल झाले होते. निवडणूक आयोगासमोरील आजची सुनावणी संपली असून, सोमवारी चार वाजता पुन्हा सुनावणी पार पडणार आहे.
वकील महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंह यांनी अजित पवारांची बाजू मांडली, तर वकील अभिषेक मनुसिंघवी यांनी शरद पवार गटाची बाजू लावून धरली. सुनावणीदरम्यान, दोन्ही गटाकडून विविध कागदपत्रे सादर करण्यात आली. यावेळी शरद पवार गटाकडून अभिषेक मनुसिंघवींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेचा दाखला दिला.
अभिषेक मनुसिंघवींचा मोठा आरोप
अजित पवार गटाकडून 1 लाख 62 हजार प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली. पण, अजित पवार गटाने मृत व्यक्तींची कागदपत्रे निवडणूक आयोगासमोर सादर केली आहेत. खोटी कागदपत्रे सादर करून अजित पवार गटाकडून पक्षावर दावा करण्यात येत आहे. आम्ही आमची बाजू निवडणूक आयोगासमोर मांडली आहे. राष्ट्रवादी पक्षाचा चेहरा शरद पवारच आहेत, असं वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले.
जयंत पाटलांची नियुक्ती बेकायदेशीर
जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष नियुक्ती बेकायदेशीर आहे, असा युक्तिवाद अजित पवार गटाचे वकील मनिंदर सिंह यांनी केला. तसेच सुनील तटकरे हेच राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, असा दावा केला. आमच्याकडे आवश्यक संख्याबळ आहे, पक्षाचा राष्ट्रीय दर्जा आणि लोकप्रतिनिधींचे संख्याबळ महत्त्वाचे आहे, असा युक्तिवाद अजित पवार गटाच्या वकिलांनी केला.
शरद पवारांची पक्षात मनमानी
शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात, असा दावा अजित पवार गटाने यावेळी केला. एका सहीवर कुणाची नियुक्ती केली जाऊ शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेला, त्यामुळे आमदारांची संख्या महत्त्वाची आहे. त्याआधारेच पक्ष ठरवता येईल, असा युक्तिवाद अजित पवार गटाने केला. महाराष्ट्रातील 53 आमदारांपैकी 43 आमदार आमच्यासोबत आहेत. तसेच विधान परिषदेच्या 9 पैकी 6 आमदार आमच्यासोबत आहे. लोकसभेचे एक आणि राज्यसभेचा एक खासदार आमच्यासोबत आहे, अशी माहितीही अजित पवार गटाने दिली.