पालापाचोळा म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले, या पालापाचोळ्यानेच...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 07:05 PM2022-07-26T19:05:14+5:302022-07-26T19:05:46+5:30

Eknath Shinde reply to Uddhav Thackeray: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांना वाटतंय की आम्ही पालापाचोळा आहोत, पण या पालापाचोळ्यानेच इतिहास घडवलेला आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Eknath Shinde's strong reply to Uddhav Thackeray, who called it "palapachola", said, "It is because of this palapachola... | पालापाचोळा म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले, या पालापाचोळ्यानेच...

पालापाचोळा म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले, या पालापाचोळ्यानेच...

Next

मुंबई - शिवसेनेत झालेले बंड आणि त्यामुळे मुख्यमंत्रिपद गमावण्याची ओढवलेली नामुष्की या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनामधील मुलाखतीमधून सविस्तर भाष्य केलं. यावेळी बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांनी पालापाचोळा असा उल्लेख केला होता. तसेच वादळात पालापाचोळा उडतोय, तो खाली बसला की खरं चित्र लोकांसमोर येईल, असं विधान केलं होतं. त्याला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांना वाटतंय की आम्ही पालापाचोळा आहोत, पण या पालापाचोळ्यानेच इतिहास घडवलेला आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या सामनामधील मुलाखतीबाबत विचारले असता एकनाथ शिंदे म्हणाले की, त्यांना आणखी काय बोलायचं ते बोलून होऊ द्या, म्हणजे आपण एकत्रित काय ते बोलू. पण त्यांना वाटतंय की आम्ही पालापाचोळा आहोत, पण या पालापाचोळ्यानेच इतिहास घडवलेला आहे. इतिहास घडवणारे कोण असतात हे या जनतेला माहिती आहे. ते या जनतेने पाहिले आहे. आमची लढाई सत्तेसाठी नाही, तर आमची लढाई ही बाळासाहेबांच्या विचारांसाठी आहे. बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका घेऊन आम्ही हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आम्हाला पालापाचोळा, पानगळ काय म्हणायचं हा त्यांचा आधिकार आहे. मात्र पुन्हा एकदा सांगतो या पालापाचोळ्यानेच इतिहास घडवला आहे, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.

दरम्यान, सामनामधील मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोरांवर घणाघाती टीका केली होती.  वादळात पालापाचोळा उडतोय, तो खाली बसला की खरं चित्र लोकांसमोर येईल. मराठी माणसांची, हिंदूंची एकजूट व्हावी म्हणून शिवसेनाप्रमुखांनी हयातभर मेहनत केली ती तोडावी मोडावी यासाठी आपल्याच काही कपाळकरंट्यांच्या हातून प्रयत्न केला जातो, याची मला चिंता आहे. म्हणून हा पालापाचोळा उडतोय तो उडू द्या, इकडून पालापाचोळा तिकडे जातोय. सडलेली पानं झडलीच पाहिजे. पाने झडताहेत ती सडलेली आहेत. ती झडून जाऊ द्या, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. 

Web Title: Eknath Shinde's strong reply to Uddhav Thackeray, who called it "palapachola", said, "It is because of this palapachola...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.