नवी दिल्ली - एकनाथ शिंदे यांची ताकद केवळ ८ आमदारांची होती, त्यात २ आमदार तळ्यात-मळ्यात स्थितीत होते. १० आमदार शिंदेंसोबत जातील ते कोण होते हे आम्हाला माहिती आहे. बाकीचे जे आमदार गेले ते अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी पाठवले असा दावा उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोण १० आमदार गेले असते हे आम्हाला माहिती होते. दोघांचे तळ्यात मळ्यात होते. उरलेले सगळे शाह आणि फडणवीसांनी पाठवले. मग त्यात हनी ट्रॅपची सीडी, पेन ड्राईव्ह असेल. रात्रीच्या अंधारात वेष बदलून काही ठिकाणी त्याचे प्रेझेंटेशन झाले. हे सगळे सत्तांतराच्या काळात घडलेले आहे आणि त्यातूनच हे सरकार पाडले. आमदार गेले, पण ४ खासदारही त्यामुळेच गेलेत. त्यांची नावे माहिती आहेत. ४ खासदार हनी ट्रॅपमुळेच गेले. त्यांना कुठे अडकवले ही जागा माहिती आहे. याबाबत आम्ही खासदारांना सावध केले होते. शेवटी तुम्ही किती खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करता हे दिसून येते असं सांगत राऊतांनी भाजपावर निशाणा साधला.
तसेच महाराष्ट्रात हनी ट्रॅपचे प्रकरण सुरू आहे, देवेंद्र फडणवीस म्हणतात असं काही नाही. मात्र रोज प्रकरणे येतायेत. रोज धाडी पडतायेत. या धाडी गुप्तपणे पडतायेत. त्यात पोलीस काहीतरी शोधतायेत. पोलिसांची पथके कुठल्या तरी सीडी आणि पेन ड्राईव्हचा शोध घेत आहेत. प्रफुल्ल लोढा हा छोटा माणूस आहे. मोठा माणूस हा मंत्रिमंडळात आहे. पोलीस तपासात या गोष्टी बाहेर यायला हव्यात. केंद्रीय तपास यंत्रणांनी तपास करावा इतके भयंकर हे सगळे आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं.
दरम्यान, महाराष्ट्रातील संजय राऊत, अनिल देशमुख आणि नवाब मलिक या तिन्ही प्रकरणात भाजपाने ईडीचा कसा गैरवापर केला आणि न्यायालयाने कसा न्याय केला हा अनुभव सरन्यायाधीशांना आहे. आज ज्यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे ते सगळेच भाजपात आहेत. ईडीचा राजकीय हत्यार म्हणून वापर केला गेला. कर्नाटक, महाराष्ट्र, छत्तीसगड इथे केला गेला. जिथे विरोधी पक्षाचे सरकार आहे तिथेच ईडीचा वापर होतो. जिथे भाजपा सरकार आहे तिथे ईडी कार्यालयाला टाळे लावलेले दिसते असं सांगत संजय राऊत यांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी ईडीबाबत केलेल्या टीप्पणीचे स्वागत केले आहे.