दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 21:35 IST2025-10-02T21:35:17+5:302025-10-02T21:35:46+5:30
Eknath Shinde Dasara Melava: लाडकी बहीण योजनेच्या भवितव्याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्यांच्या पुढाकाराने ही योजना सुरू झाली होती ते राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आज दसरा मेळाव्यात संबोधित करताना लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान केलं आहे.

दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द
गतवर्षी लोकसभा निवडणुकीत झालेल्या पीछेहाटीनंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणलेली लाडकी बहीण योजना महायुतीच्या चांगलीच पथ्थ्यावर पडली होती. तसेच या योजनेच्या जोरावर विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारली होती. मात्र या योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडत असल्याने तिच्यावर टीका होत आहेत. तसेच या योजनेच्या भवितव्याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्यांच्या पुढाकाराने ही योजना सुरू झाली होती ते राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आज दसरा मेळाव्यात संबोधित करताना लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान केलं आहे.
मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्याला संबोधित करताना एकनाथ शिंदे लाडकी बहीण योजनेबाबत म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेबाबत विरोधक उलट सुलट अफवा पसरवत आहेत. पण मी इथून सांगतो की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे.
एकनाथ शिंदे यांनी यावेळी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीत घेतलेल्या निर्णयांचीही यादी वाचून दाखवली. पाच कोटी लोकांच्या घरात जाऊन शासन आपल्या दारी योजनेचा लाभ दिला. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीत काम केलं म्हणून महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला एकतर्फी विजय मिळाला. आमच्या २३२ जागा निवडून आल्या. म्हणून मी इथून सांगतो की, शेतकऱ्यांना सर्व निकष बाजूला ठेवून मदत दिली जाईल, असेही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.