सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 16:43 IST2025-08-06T16:43:10+5:302025-08-06T16:43:45+5:30
१० व्या परिशिष्टानुसार विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेचा निर्णय घ्यायचा असतो म्हणून सुप्रीम कोर्टाने त्यांच्याकडे हे प्रकरण पाठवले होते असं त्यांनी सांगितले.

सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
मुंबई - एकनाथ शिंदे याआधी इतक्यांदा दिल्लीत गेलेले दिसले नाही. बहुमताच्या जोरावर शांतपणे सत्ता उपभोगत होते. मात्र कोर्टातील काही सूत्रांकडून त्यांना सुनावणीचा निकाल आपल्याविरोधात येणार आहे असं कळले असेल. मग त्यापुढची रणनीती काय असेल, एकनाथ शिंदे यांनी भाजपात जायचे का, मग भाजपा त्यांच्यासोबत असलेल्या सर्वांनाच घेणार आहे असं नाही. त्यामुळे शिंदेसोबत असलेल्यांना कायमचे राजकीय अनाथपण येणार आहे असा दावा कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी केला आहे.
असीम सरोदे म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत निकाल दिल्यानंतर पुढची रणनीती काय असेल हे ठरवावे लागणार आहे. निकालाची वेळ थोडी टळली आहे परंतु ऑगस्टच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होणार आहे. त्यामुळे कोण कुणासोबत जाणार, आपण कुणाला घेणार, मग त्यांच्याकडे अधिकार काय असणार हे ठरवले जात आहे. न्या. चंद्रचूड यांनी जो निर्णय दिला, त्यात राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले होते. बहुमत चाचणी बोलवली नाही. विधानसभा अध्यक्षांच्या वागणुकीवर निकालात भाष्य आहे. या निर्णयापूर्वी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण आणि शिवसेना नाव वापरण्याची परवानगी दिली. आता सुप्रीम कोर्टात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निर्णय आणि पक्ष, चिन्हाबाबत सुनावणी एकत्रित घेतली जाणार आहे. त्यातून एक स्पष्टताच येणार आहे. १० व्या परिशिष्टानुसार विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेचा निर्णय घ्यायचा असतो म्हणून सुप्रीम कोर्टाने त्यांच्याकडे हे प्रकरण पाठवले होते असं त्यांनी सांगितले.
तर सहा महिने सुनावणी केल्यानंतर पक्षांतर आणि अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घ्यायला सांगितला होता. मग राहुल नार्वेकरांनी या प्रकरणावर निर्णय देताना कुणीच अपात्र नाही असा निर्णय घेतला. हा पक्षातंर्गत वादाचा मुद्दा आहे असं त्यांनी म्हटलं. मग पक्षातंर्गत वादाचा मुद्दा असताना राहुल नार्वेकरांना यावर निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता. नार्वेकरांनी याबाबत सुप्रीम कोर्टाला प्रथमदर्शनी हा पक्षातंर्गत वादाचा मुद्दा आहे असं सांगून फाईल परत पाठवायला हवी होती. या चुका विश्लेषणाच्या पातळीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीस येतील तेव्हा राजकीय समीकरण बदलणार आणि संविधानिक हा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे असंही असीम सरोदे यांनी दावा केला. एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
दरम्यान, जो सुप्रीम कोर्टाचा निकाल येईल त्यातून संविधानाचा विजय होईल. कारण असे प्रकार देशात चालणार की नाही हे निकालातून स्पष्टता येईल. निवडणूक कोणाकडूनही लढवा, निकालानंतर राजकीय बेरीज मांडली जाईल, त्यांना पैसे देऊ, पक्ष फोडू हा जो असंविधानिक अट्टाहास आहे. त्यामुळे अशा प्रकारे पक्षफोडी, पक्षांतरे चालणार का, जे पक्षातून गेले त्यांनाच मूळ पक्ष तुमचा असल्याचं निवडणूक आयोगाचा निकाल हे चालणार का यासारख्या गोष्टींमुळे सुप्रीम कोर्टाला निकाल महत्त्वाचा आहे. पक्षांतर बंदीत १० व्या परिशिष्टाचे महत्त्व नसेल तर ते घटनेतून काढायला हवे आणि कायदा अस्तित्वात असेल आणि संविधानात असेल तर त्याचे पालन झाले पाहिजे असंही असीम सरोदे यांनी म्हटलं.