"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 14:14 IST2025-10-29T14:14:03+5:302025-10-29T14:14:40+5:30
मतचोरीचा आरोप हा राहुल गांधींच्या फेक नरेटिव्हचं जाळे आहे. त्या जाळ्यात महाराष्ट्रातले विरोधी पक्ष अडकले आहेत असा टोला शिंदेसेनेचे नेते संजय निरूपम यांनी लगावला.

"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
मुंबई - उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी खालच्या स्तरावर जाऊन टीका केली आहे. संजय राऊत सर्वात मोठा XXX आहे. मी जाणुनबुजून हे शब्द वापरतोय, कारण ही व्यक्ती त्याच लायकीची आहे अशा शब्दात निरूपम यांनी राऊतांवर टीका केली आहे.
मुंबईतील पत्रकार परिषदेत पत्रकारांनी संजय राऊतांबाबत संजय निरूपम यांना प्रश्न विचारला होता. त्यावेळी निरूपम म्हणाले की, मी याआधीही सांगितलंय, संजय राऊत हा सर्वात मोठा XXX आहे. अशा XXX लोकांच्या बोलण्यावर आम्ही प्रतिक्रिया देत नाही. त्यांनी XXX पणा केल्यामुळे त्यांचा पक्ष संपला. त्यांनी काँग्रेसला संपवले. त्यांनी शरद पवारांच्या पक्षाच्या संपवले. त्यांच्यामुळेच जे बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार असल्याचा दावा करतात त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी विश्वासघात केला. जनतेने त्यांना नाकारले. त्यामुळे असल्या XXX लोकांच्या विधानावर आम्हाला कुठलीही कमेंट करायची नाही अशा भाषेत त्यांनी वादग्रस्त विधान केले.
संजय निरूपम यांनी राऊतांबाबत वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दाबाबत पत्रकारांनी पुन्हा प्रश्न विचारला. तुम्ही ४ वेळा ज्या शब्दांचा वापर केला, ते तुम्ही जाणुनबुजून हेतूने केले का असं विचारले. त्यावर होय, मी जाणुनबूजून या शब्दाचा वापर केला, कारण ही व्यक्ती त्याच लायकीची आहे असंही एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे नेते संजय निरूपम यांनी उत्तर दिले.
मतचोरीचा फेक नॅरेटिव्ह, विरोधकांचा आरोप चुकीचा
दरम्यान, मतचोरीचा आरोप हा राहुल गांधींच्या फेक नरेटिव्हचं जाळे आहे. त्या जाळ्यात महाराष्ट्रातले विरोधी पक्ष अडकले आहेत. मतदार यादीत सगळे नाव योग्य आहेत, एकही नाव फेक नाही असं आम्ही सांगत नाही. परंतु मतदार यादीत जो काही घोळ, चूक आहे त्यामागे एक मोठा कट आहे. त्यात राजकीय पक्षाचा सहभाग आहे हे म्हणणं चुकीचे आहे. मतदार यादीत याआधीही बऱ्याच चुका होत्या. कधी फोटोंची अदलाबदल होते. कधी नावे बदलली जातात. या तांत्रिक चुका आहेत. त्याविरोधात बोलायला पाहिजे. निवडणूक आयोगावर दबाव टाकायला पाहिजे. मात्र यात सत्ताधारी पक्षाचे कटकारस्थान आहे. त्यांच्या सांगण्यावरून निवडणूक आयोग बोगस मतदार तयार करतो, निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला ते मतदान करतात हा नॅरेटिव्ह चुकीचा आहे असं सांगत संजय निरूपम यांनी विरोधकांच्या आरोपांवर भाष्य केले.