शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 06:44 IST2025-11-23T06:43:42+5:302025-11-23T06:44:36+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांनी जातपात धर्म पंथ न बघता एक आदर्श राज्य घडवले. तोच आदर्श घेऊन शिवसेना पुढे जात आहेत असं शिंदेंनी म्हटलं.

शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
मुंबई - नगरपंचायत, नगरपरिषद व जिल्हा परिषदा,महापालिका निवडणुकीत भक्कमपणे लढण्यासाठी शिंदेसेनेने पक्षातील ज्येष्ठ नेते, खासदार व आमदारांची जिल्हा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. निवडणूक कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत संपर्क प्रमुखांनी त्यांच्या जिल्ह्यातच थांबावे, असे निर्देशही पक्षाचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
मुंबईसाठी नियुक्ती नाही
शिंदेसेनेचे सचिव संजय मोरे यांनी ४० जिल्हा संपर्कप्रमुख नियुक्तीबाबतचे प्रसिद्धिपत्रक जारी केले आहे. मात्र, यामध्ये मुंबईसाठी कोणतीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. खा. नरेश म्हस्के यांच्याकडे ठाणे, नवी मुंबई व पुण्याची तर प्रकाश पाटील यांच्याकडे ठाणे ग्रामीणची जबाबदारी देण्यात आली आहे. कोकणात किरण पावसकर व राजेश मोरे (सिंधुदुर्ग), यशवंत जाधव (रत्नागिरी), संजय घाडी (रायगड ग्रामीण), रवींद्र फाटक (पालघर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, डहाणू येथील प्रचारसभेत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी जातपात धर्म पंथ न बघता एक आदर्श राज्य घडवले. तोच आदर्श घेऊन शिवसेना पुढे जात आहेत. राज्यात सुरु झालेल्या कल्याणकारी योजना कदापि बंद होणार नाहीत. जव्हारच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचे सांगत त्यांनी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेला विजयी करण्याचे आवाहन शिंदेंनी मतदारांना केले. वाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून त्यावर शिवसेनेचेचा भगवा फडकेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. वाडा नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून हेमांगी पाटील निवडणूक लढवत असून शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये दोन मुस्लिम महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे.