रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 17:48 IST2025-11-09T17:47:59+5:302025-11-09T17:48:41+5:30
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी युतीला तिलांजली दिली आहे. प्रदेशाध्यक्षाचे काम युती धर्म पाळायचे असते, परंतु चव्हाणांनी त्यांच्या बॅनरवरून, भूमिपूजन कार्यक्रमातून स्पष्ट दाखवून दिले, कुठेही युती धर्म पाळला जात नाही असा आरोप शिंदेसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी केला आहे.

रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
डोंबिवली - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर असताना महायुतीतभाजपा आणि शिंदेसेना यांच्यातील वितुष्ट वाढत असल्याचे दिसून येत आहे. कल्याण-डोंबिवलीतील शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज भाजपात प्रवेश केला. त्यामुळे नाराज झालेले शिंदेसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी भाजपावर आगपाखड केली आहे. युती धर्म पाळायचा नसेल तर स्पष्ट सांगा, आम्हीही उत्तर द्यायला समर्थ आहोत असं आव्हान त्यांनी भाजपाला करत रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला.
शिंदेसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम म्हणाले की, महाराष्ट्रात युतीचं सरकार आहे आणि अशावेळी साम्यजंस्याने एकमेकांचे कार्यकर्ते आपापल्या पक्षात घेऊ नयेत हे ठरलेले असते. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जशा जवळ येत आहे तसं भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी युतीला तिलांजली दिल्याचे दिसून येते. गेल्या अनेक कार्यक्रमातून, पक्षप्रवेशातून हे दिसून येते. काही दिवसांपूर्वी अंबरनाथ येथील आमचे माजी नगरसेवक असतील, कल्याण पूर्वेतील नगरसेवकांचा प्रवेश करून घेतला आणि आज डोंबिवलीतील आमच्या पदाधिकाऱ्यांचाही प्रवेश करून घेतला. त्यामुळे भाजपाला युती नको का हे त्यांनी स्पष्ट सांगावे असं त्यांनी विचारले आहे.
तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी युतीला तिलांजली दिली आहे. प्रदेशाध्यक्षाचे काम युती धर्म पाळायचे असते, परंतु चव्हाणांनी त्यांच्या बॅनरवरून, भूमिपूजन कार्यक्रमातून स्पष्ट दाखवून दिले, कुठेही युती धर्म पाळला जात नाही. असं असेल तर आम्ही आमच्या पक्षप्रमुखांना विनंती केली आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कार्यामुळे, मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राज्यात पुन्हा युतीचे सरकार आले आहे. जर शिवसेनेला विचारात घेतले जात नसेल तर एकनाथ शिंदे यांनीही संयमाची भूमिका ठेवू नये. शिवसैनिक प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायला समर्थ आहे. भाजपा युती धर्म पाळत नसेल तर आपणही पाळू नये अशी आमची भावना आहे अशी मागणी राजेश कदम यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
नेमकं काय घडलं?
आज डोंबिवलीतील शिंदेसेनेचे पदाधिकारी भाजपात सहभागी झाले. त्यात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील प्रभाग क्र. ८५च्या माजी नगरसेविका पूजा म्हात्रे, युवसेना कल्याण जिल्हा समन्वयक योगेश म्हात्रे, विभाग प्रमुख रविंद्र म्हात्रे, जयेश चकोर, माजी शाखाप्रमुख बाळकृष्ण कानडे, विभाग महिला संघटक अनुजा सावंत यांच्यासह इतर पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश झाला. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
भाजपा पक्ष प्रवेश सोहळा, डोंबिवली पूर्व
— Ravindra Chavan (@RaviDadaChavan) November 9, 2025
डोंबिवली एमआयडीसी परिसरातील शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांचा भाजपा परिवारात प्रवेश
📍पक्ष प्रवेश करणारे मान्यवर -
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील प्रभाग क्र. ८५च्या माजी नगरसेविका पूजाताई योगेश म्हात्रे, युवसेना कल्याण जिल्हा समन्वयक… pic.twitter.com/sDoxO463bE